स्मार्ट कार्डची अचानक अंमलबजावणी; महिला - ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ

Foto
स्मार्ट कार्ड नसल्याने सवलतीऐवजी पूर्ण तिकीटाचा भुर्दंड

अलिम चाऊस

गंगापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने महिला व ५५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. गंगापूर बसस्थानकासह विविध एसटी केंद्रांवर तसेच खासगी एजन्सीच्या माध्यमातून स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

३१ ऑगस्टपर्यंत राज्यभरातील सुमारे ४ लाख ८६ हजार ८५४ पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३ लाख ८७ हजार ७५५ पात्र प्रवाशांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. आजपासून स्मार्ट कार्डचा वापर करण्याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता असून, स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी विविध केंद्रांवर महिला व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून पात्र प्रवाशांना एसटीच्या प्रवासातील सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित एसटी केंद्रांवर प्रवाशांना मार्गदर्शन केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी गर्दी वाढल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

अचानक स्मार्ट कार्डची अंमलबजावणी; महिला - ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ एसटी महामंडळाने अचानक स्मार्ट कार्ड अभियानाची अंमलबजावणी सुरू केल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मार्ट कार्ड उपलब्ध नसल्याने अनेक पात्र प्रवाशांना सवलतीचा लाभ न मिळता फुल तिकीट काढावे लागत आहे. 
स्मार्ट कार्ड वितरणाची पुरेशी व्यवस्था करूनच अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.