मुंबई : इंधन पुरवठ्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झालेले आहे. शेतकऱ्यांना डिझेल योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक २० ते ३० टक्क्यांची वाढ झालेली आहे. कोणी साठेबाजी करत असेल, तर त्यावरही लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
ग्रामीण भागात इंधन मिळत नाही, याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना ते म्हणाले की, यासंदर्भात सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना जे डिझेल लागेल, ते उपलब्ध करून द्या. परंतु, शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल, तर त्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागात अचानक २० ते ३० टक्क्यांनी पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढल्याचे दिसत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे
दरवर्षी आपल्याला किती इंधन लागते, हे आपल्याला माहिती आहे. त्यात जर अचानक २० ते ३० टक्के वाढ होत असेल, तर त्यात काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. अशा दृष्टीने काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणे सुरू केले आहे. मला असे वाटते की, आपण ते करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, देशात पुन्हा एकदा शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल प्रति लिटर ८७ पैसे, तर डिझेल प्रति लिटर ९१ पैशांनी महागले. गेल्या दहा दिवसात तिसऱ्यांदा ही दरवाढ झाली आहे. यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १९ मे रोजी पेट्रोल दरात ८७ पैशांनी आणि डिझेल दरात ९१ पैशांची वाढ झाली होती.