साखर झाली स्वस्त, गुळाच्या दरांतही १६०० रुपयांची घसरण, अचानक काय घडलं?

Foto
सांगली: श्रावण महिना आणि अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे राज्यातील साखर आणि गुळाच्या मागणीत वाढ होत असते. अशातच महिन्याभरापासून साखरेच्या दरात भरमसाट वाढ झाली. किरकोळ बाजारात साखर सत्तरीपार पोहोचल्याने गुळाचा भावही वाढला होता. परंतु, सरकारच्या उपायांमुळे साखरेच्या दरात घसरण सुरू झाली आणि गुळाचे भावही घसरत आहेत. बुधवारी साखर प्रतिकिलो ५२ रुपयांवर आली. तर गूळ प्रतिक्विंटल १६०० रुपयांनी स्वस्त झाला.

ऐन श्रावणात गुळाचे मार्केट असं...
एकीकडे साखरेच्या दरात घसरण सुरू असताना गुळाचे दरही कमी होऊ लागले आहेत. चार दिवसांपूर्वी ७ हजार रुपये क्विंटलने विकला जाणारा गूळ आता ५४०० ते ५८०० रुपयांपर्यंत आला आहे. ऐन श्रावणात प्रतिक्विंटलमागे १६०० रुपयांनी मार्केट कोसळल्याने गूळ उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

साखर आणखी स्वस्त होण्याची शक्यता
साखरेच्या दरातील घसरण बुधवारीही चालूच राहिली. दर प्रतिकिलो ५२ रुपयांपर्यंत खाली आले. संभाव्य टंचाई आणि साठेबाजीच्या संशयावरून केंद्र सरकारने सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे साखरेचे दर आणखी खाली येऊन ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरातील वाढीमुळे केंद्र सरकारने साठेबाजीच्या संशयावरून व्यापारी आणि कारखान्यांचा प्रत्यक्ष साखर साठा तपासणी सुरू केली आहे. तसेच १० लाख टन साखर आयातीचा निर्णयही घेतला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या तीन दिवसांत साखरेचे दर प्रति किलो १३ रुपये कमी होऊन ते ६५ रुपयांवरून ५२ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. येत्या काही दिवसांत ते आणखी कमी होतील असा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

साठेबाजीची चर्चा
साखरेची साठेबाजी करणार्‍यांविरुद्ध सरकारने कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. यासाठी गोदामांची तपासणी सुरू आहे. यात प्रामाणिक व्यापारी, कारखानदारांनाही तपासणीला सामोरे जावे लागत आहे. यावरून साठेबाजी कुणी केली यावरून व्यापारी आणि कारखानदार खासगीत एकमेकांवर आरोप करत आहेत. सणासुदीच्या काळातील भाववाढीने सामान्य चिंतेत आहेत. यामुळे साखर साठेबाजीच्या चर्चा सर्वत्र होत आहेत.