८८ लाख मे. टन गाळप, ७० लाख ७० हजार क्विंटल साखर उत्पादन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): विभागीय प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यातील एकूण २२ साखर कारखान्यांनी ८८ लाख ६ हजार १७४ मॅट्रिक टन उसाचे गाळप केला आहे. आतापर्यंत ७० लाख ७० हजार ९१० किंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जादा भावामुळे मराठवाड्यातील ऊस बाहेरील कारखाने पळवित असल्याचे चित्र आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील ऊस अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे गाळपासाठी जात असल्याने यंदा मराठवाड्यातील साखर कारखाने मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विभागाबाहेरील साखर कारखान्यांकडून उसाला जादा भाव मिळत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी गाळपाला बाहेर ऊस घालत असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली. विभागीय साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत जालना बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साखर उत्पादनावर देखरेख ठेवली.
-- ऊस उत्पादनही घटले --
गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने ऊस पिकाखालील क्षेत्र कमालीचे वाढल्यामुळे यंदा मराठवाड्यातील साखर कारखाने एप्रिलअखेर सुरू राहतील, असा अंदाज होता. गतवर्षी झालेली अतिवृष्टी आणि हवामान बदलाचा फटका उसाच्या उत्पादनाला बसला आहे.
--उत्पादन घसरून ५० ते ६० टनावर --
मराठवाड्यात हेक्टरी सरासरी ५० ते ७० ७५ टन उसाचे उत्पादन होते. यंदा हे उत्पादन घसरून ५० ते ६० टनावर आले आहे. शिवाय उसाचा उतारा १० ते ११ टक्के अपेक्षित असतो. यंदा मात्र हा उतारा सरासरी ८ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
-- गतवर्षी १९ कारखाने सक्रिय --
विभागातील या कारखान्यांनी आतापर्यंत ८८ लाख ६ हजार १७४ मीटर उसाचे गाळप केले आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि बीड जिल्ह्यातील ऊस अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळपासाठी पळवित आहेत. समाधानकारक दर तसेच योग्य वेळी ऊसतोड होत असल्याने मराठवाडा बाहेरील कारखान्यांना शेतकऱ्यांनी आपला ऊस घातल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गतवर्षी जालना बीड आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील एकूण १९ साखर कारखाने चालू होते. यंदा गाळप हंगामात मागली आठवड्यात फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्यानेही गाळप हंगामात उडी घेतली आहे. जात आहे. तीन जिल्ह्यातील १३ सहकारी आणि ९ खासगी असे २२ साखर कारखाने यंदा गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. यंदा २ नोव्हेंबर २०२५ पासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, सध्या हंगामाला वेग आला आहे.













