औरंगाबाद : रांजणगाव शेणपुंजी परिसरातील शिवनेरी कॉलनी येथील 25 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली.सुनील नामदेव भोटकर (वय 25 वर्षे, रा. शिवनेरी कॉलनी) असे गळफास घेऊन आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हा मूळचा सिल्लोड तालुक्यातील वीरगाव येथील आहे. तो काही दिवसांपासून कामानिमित्त वाळूज परिसरात राहत होता. तो एका खासगी कंपनीत काम करीत होता. काल तो कामाला कंपनीत गेला नव्हता. त्यामुळे त्याचे मित्र त्याला भेटण्यासाठी खोलीवर गेले होते. त्यावेळी सुनीलने पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले.मित्रांनी ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळवली. पोलिसांनी सुनीलला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. जमादार बहुरे हे तपास करीत आहेत.