औरंगाबाद: क्षयरोगाचा आजार जडलेल्या पत्नीचा मृत्यू होताच 65 वर्षीय वृद्ध पतीने पत्नीच्या साडीनेच घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे साडेतीन वाजता मुकुंदवाडीतील रामनगर भागात घडली. विमलबाई भाऊसाहेब गोसावी (वय 60 वर्षे) व भाऊसाहेब हिरामण गोसावी (वय 65 वर्षे) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत भाऊसाहेब गोसावी हे महाराष्ट्र जनरल कामगार युनियन व असोसिएशन ऑफ इंजिनीअरिंग वर्कर्स संघटनेचे माजी सचिव होते. त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने केली होती. सध्या ते निवृत्त झाल्याने घरीच होते.पती, मुलगा, दोन नातवंडांसोबत ते राजनगर भागात वास्तव्यास होते. अध्यात्माकडे त्यांचा जास्त ओढा होता. ते धार्मिक कार्यात सतत अग्रेसर असायचे. त्यांची पत्नी विमलबाई या क्षयरोगाने नेहमी आजारी होत्या. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. भाऊसाहेब गोसावी यांचा मुलगा घराच्या वरच्या मजल्यावर झोपला होता. मात्र, त्याला न उठवता त्यांनी पत्नीच्या निधनाची बातमी पैठण तालुक्यात राहणार्या पुतण्याला फोनवरून कळवली. त्यानंतर पत्नीच्या निधनाने निराश झालेल्या भाऊसाहेबांनी पत्नीच्या साडीने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊसाहेब यांचा मुलगा झोपलेला असल्याने त्याला काहीच समजले नाही. पैठण येथून भाऊसाहेब यांच्या पुतण्याने फोन करून भाऊसाहेब यांच्या मुलाला आईच्या निधनाची बाब सांगितली. त्याने खाली जाऊन पाहिले असता आईचा मृत्यू झाला होता, तर वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. एकाच दिवशी काही अंतराने भाऊसाहेब व विमलबाई यांचा मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्तकरण्यात येत आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार एस. ए. मनगटे करीत आहेत.