लातूरचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांची आत्महत्या

Foto
लातूर : लातूर येथील एम.जे. हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड यांनी बुधवारी लातूर शहराजवळ स्वतःच्या चार चाकी गाडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी स्वतःलाच भूल देणारे इंजेक्शन देऊन ही आत्महत्या केल्याचं पुढं आलं आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे. लातूर शहराजवळील अंबाजोगाईकडे जाणार्‍या गाडीत डॉ. मेहुल राठोड हे आढळून आले होते.

प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी स्वतःलाच भूल देणारे इंजेक्शन दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बुधवारी दुपारी २ वाजता पत्नी रुग्णालयात गेल्यानंतर डॉ. मेहुल स्वतःची इनोव्हा कार घेऊन घराबाहेर पडले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत ते न परतल्याने पत्नीने फोन केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मोबाईल लोकेशन ट्रॅक केले असता, घरापासून ८ किलोमीटर दूर अंबाजोगाई रोडवरील एमआयटी कॉलेजजवळ त्यांची कार आढळली.

औषधाचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या
कॅन्सर तज्ज्ञ असलेल्या पत्नी डॉ. प्रियांका आणि रुग्णालयातील एका कर्मचार्‍याने तिथं धाव घेतली तेव्हा डॉ. मेहुल बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने फुलाबाई बनसोडे रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. ही इस नो मोर म्हणत डॉक्टरांनी पत्नीला मोठा धक्का दिला. भूल देण्यासाठी वापरण्यात येणार्‍या औषधाचा ओव्हरडोस घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं असून, या घटनेने लातूरच्या वैद्यकीय विश्वावर शोककळा पसरली आहे.

रिकाम्या बाटल्या अन् इंजेक्शन
डॉ. राठोड यांच्या इनोव्हा कारमध्ये पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे देखील सापडले आहेत. डॉ. राठोड यांच्या सीटच्या बाजूच्या सीटवर काही इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या अन् इंजेक्शन आढळून आलं आहे. त्यामुळे डॉ. राठोड यांनी आत्महत्याच केल्याचं प्राथमिक तपासात पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणात घातपाताच्या अँगलने देखील चौकशी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा देखील केलाय.