पैठण तालुक्यातील लिमगाव येथील एका तरुण शेतकर्याने कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली.पाचोडपासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या लिमगाव येथील नवनाथ सूर्यभान पाचे (वय २६ वर्षे,रा. लिमगाव, ता. पैठण) या तरुणाने कर्जबाजारी झाल्यामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली.
रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये पाणी भरण्यासाठी जातो, असे सांगून शेतात जाऊन नवनाथने विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. रांजणगाव शिवारात पाचे कुटुंबाची शेती आहे. यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे त्यांची मोसंबीची झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत. हे आर्थिक नुकसान आणि एसबीआय बँकेचे कर्ज व सोसायटीचे कर्ज आणि इतर हात उसने घेतलेले पैसे कसे परत करायचे, याची चिंता नवनाथला भेडसावत होती.
जिवापाड जपलेली मोसंबीची बाग हातची गेली. त्यामुळे आता कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत तो होता. या तणावग्रस्त परिस्थितीत नवनाथने ७ एप्रिल रोजी शेतात जाऊन आत्महत्या केली. रात्री गेलेला मुलगा सकाळ झाली तरीही परत आला नाही म्हणून नवनाथच्या वडिलांनी मुलाला मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा मोबाईल बंद होता. यामुळे नवनाथने वडील सूर्यभान पाचे व मेव्हणे यांनी शेतात जाऊन शोध घेतला असता नवनाथ हा मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिस पाटलांना कळवली व पोलिस पाटलांनी ताबडतोब पाचोड पोलिस ठाण्यास माहिती दिली. खबर मिळताच पाचोड पोलिस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी नवनाथ यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी असलेल्या डॉ. सौदागर यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून त्याचे प्रेत नातेवाईकाकडे सुपूर्त केले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहिते हे करत आहेत.