औरंगाबाद : निवडणुकीचा ज्वर ओसरल्यानंतर आता तापमानाचा पारा वर चढला आहे. काल दिवसभराचे कमाल तापमान ४२.५ डिग्री तर किमान तापमान २९.६ डिग्री सेल्सिअस राहिले. त्यामुळे उष्णतेने नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली. अशीच स्थिती आजही राहणार आहे. आज सकाळी अकरा वाजताच तापमानाचा काटा ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचला. आजचे कमाल तापमान ४३ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने विदर्भासह मराठवाड्यातील परभणी आणि बीड जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला. २५ एप्रिल पासूनच तापमानात उत्तरोत्तर वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता तो आता खरा ठरताना दिसतो. गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा ३८ ते ४१ डिग्री सेल्सिअस दरम्यान स्थिरावला होता. आता मात्र बीड आणि परभणी जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेने त्रस्त केले आहे. औरंगाबादेतही तापमानाचा पारा सारखा वर वर सरकताना दिसतो. काल शहराचे कमाल तापमान ४२.५ डिग्री सेल्सिअस वर पोहोचले. गेल्या दोन दिवसात कमाल तापमानात तीन ते चार डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे. रात्रीचे तापमान २९.६ डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचल्याचे चिकलठाणा वेधशाळेचे संजय भांबक यांनी सांगितले. जिल्ह्यात उष्णतेची लाट नसली तरी तापमानाचा पारा दोन ते तीन डिग्री सेल्सिअस अधिक राहणार आहे. गेल्या दोन दिवसात ३९.६ डिग्री अंश सेल्सिअस वरून तापमानाचा पारा ४२.५ डिग्री सेल्सिअसवर स्थिरावला. कमाल तापमानातही २७ ते २९ अशी वाढ झाली आहे. काल रात्रीचे कमाल तापमान २९.६ डिग्री सेल्सिअस एवढे होते. आज सकाळी अकराच्या सुमारास तापमानाचा पारा ४०.१ डिग्री सेल्सिअस वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे दुपारचे कमाल तापमान ४३ डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणार असल्याचे भीती त्यांनी व्यक्त केली. अजूनही दोन-तीन दिवस उष्णतेचा पारा वरवर सरकण्याची शक्यता आहे.
यावर्षी विक्रमी तापमान
शहर व जिल्ह्यासाठी यंदाचे वर्ष उष्णतामानाचे राहील असे बोलले जाते. मार्च ते एप्रिलच्या मध्यापर्यंत सामान्य असलेला तापमानाचा पारा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वर वर सरकतो आहे. गेल्या आठवडाभरात चार ते पाच डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २५ एप्रिल ते २९ एप्रिल पर्यंत तापमान अधिक असेल. त्याचा प्रत्ययही येत आहे. कालच्या आणि आजच्या तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सिअसचा फरक जाणवतो. गुरुवारी सकाळी ११ वाजता ३९.६ डिग्री सेल्सियस तापमान होते. तर दिवसाचे कमाल तापमान ४२.५ डिग्री सेल्सिअस एवढे होते. आज सकाळी ११ वाजता ४०.१ एवढे तापमान राहिले. त्यात दिवसभरात किमान दोन ते तीन डिग्री सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचे कमाल तापमान ४३ डिग्री सेल्सिअस राहील अशी शक्यता आहे.
सावधगिरी बाळगण्याचा इशारा
हवामान खात्याने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार काही मार्गदर्शक सूचनाही जिल्हाआपत्ती नियंत्रण कक्षाने जारी केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेने पासून वाचण्यासाठी पातळ व सुती कपडे परिधान करावेत, बाहेर पडताना डोळ्याला गॉगल, छत्री, डोक्यावर टोपी परिधान करावी, जास्त प्रमाणात पाणी प्यावे, प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना कपड्याने डोके झाकावे, दुपारी १२ ते ३:३० घराबाहेर पडणे टाळावे, तर लहान मुलांना अथवा प्राण्यांना बंद अथवा एका जागी उभ्या केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी १२ ते ३:३० या वेळेत उन्हात फिरणे टाळावे, उष्णतेच्या काळात शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात, महिलांनी दुपारी स्वयंपाक करणे टाळावे अशा सूचना आपत्ती नियंत्रण कक्षाने दिल्याचे जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी अजेय चौधरी यांनी सांगितले.