बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींच्या जन्मठेपेला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

Foto
नवी दिल्ली :  बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींच्या जन्मठेपेच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. या आरोपींनी १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या पुढच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे आणि जामीन मंजूर केला आहे. या दोन्ही आरोपींच्या वकिलांनी हा दावा केला की दोन आरोपींपैकी एकजण हा दिव्यांग आहे. त्यामुळे त्याला दिलासा देण्यात आला आहे. जस्टिस एमएम सुंदरेश आणि जस्टिस प्रसन्ना बी वराले यांच्या पीठाने हा आदेश दिला आहे.

सर्वोच्च न्यायालाने सांगितले आरोपींना जामीन देण्यामागचे कारण
२८ ऑक्टोबरला बिल्कीस बानो प्रकरणातील दोन आरोपींच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आणि त्यांना जामीन मंजूर कऱण्यात आला. आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले  आहे की १७ वर्षांहून अधिक काळ दोन्ही आरोपींनी तुरुंगात घालवला आहे. त्यातला एक आरोपी दिव्यांग आहे. घटना घडल्यानंतर तीन वर्षांनी त्याला या प्रकरणात आरोपी करण्यात आले. दरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजा ठाकरे यांनी या जामीन मिळावा म्हणून करण्यात आलेल्या याचिकेचा कडाडून विरोध केला. कनिष्ठ न्यायालय आणि बॉम्बे हायकोर्टाने दोन्ही आरोपींविरोधात देण्यात आलेली साक्ष विचारांत घेऊनच त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसंच जो अपराध यांनी केला आहे त्याचं गांभीर्यही लक्षात घेतलं गेलं पाहिजे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला आहे.

बिल्किस बानो प्रकरण नेमके काय?
२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गोध्रा या स्टेशनजवळ साबरमती एक्स्प्रेसचे काही डबे जाळण्यात आले. या घटनेत अयोध्येतून परतणार्‍या ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. गुजरातमध्ये दंगल पेटली. याच दंगलीत बिल्किस बानोचं कुटुंबही सापडलं आणि होरपळून निघालं.

३ मार्च २००२ ला काय घडले होते ?
बिल्किस बानो आणि तिचं कुटुंब जिथे लपलं होतं तिथे ३ मार्च २००२ या दिवशी २० ते ३० लोकांचा जमाव आला. त्यांच्या हातात तलवारी आणि काठ्या होत्या. त्यांनी या घरावर हल्ला केला. तसंच बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही भयंकर घटना घडली तेव्हा बिल्किस बानो पाच महिन्यांची गर्भवती होती. तिच्या घरातल्या सात कुटुंबीयांची हत्या करण्यात आली. त्यावेळी तिच्या कुटुंबातले सहाजण पळून गेले होते. या प्रकरणात सीबीआय कोर्टाने ११ जणांना दोषी ठरवण्यात आलं. या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यातल्या एका आरोपीने गुजरात उच्च न्यायालयात एक अर्ज केला होता. त्यात त्याने रिमिशन पॉलिसीच्या अंतर्गत सुटकेची मागणी केली होती. गुजरात उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. बिल्किस बानोही या हल्ल्यात मारली गेली आहे असं मारेकर्‍यांना वाटलं. तसंच तिच्या कुटुंबावर या हल्ल्याचा इतका गहिरा परिणाम झाला की सहाजण बेपत्ता झाले. १७ पैकी सात जणांची हत्या झाली. एक कुटुंब या एका घटनेने उद्ध्वस्त झालं. बिल्किस बानो हल्ल्यानंतर आणि सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तीन तास बेशुद्ध होती.