नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये विलीन होणार अशी चर्चा रंगली असतानाच, आज (१० ऑगस्ट) दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी भेट घेतली. या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. जवळपास अर्धा तास ही बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील प्रश्नांसह इतर प्रश्नांवरती सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संबंधित खासदारांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील समस्या पंतप्रधानांकडे मांडल्याचं समोर येत आहे. यामध्ये काही ठिकाणी पूरपरिस्थिती, तर काही ठिकाणी पावसाचा अजूनही थांगपत्ता नसल्याने, तसेच पिकांच्या किंमती संदर्भात, तर काहींनी विकासाच्या संदर्भात मुद्दे उपस्थित केल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीमधील ८ खासदार उपस्थित होते. खासदारांनी आपल्या समस्या या पंतप्रधानांकडे मांडण्यात आल्या आहेत. यावेळी पंतप्रधानांनी या खासदारांचे म्हणणे ऐकून घेऊन, त्या समस्या सोडवल्या जातील असं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये राष्ट्रवादीकडून महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कवी अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दुसरीकडे, ही वरवरची चर्चा दिसत असली तरी, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाविषयी एनडीएमध्ये विलीन होण्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. कालसुद्धा राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा मुंबई ते कोल्हापूरपर्यंत एकत्र विमानातून प्रवास झाला होता, तसेच जयंत पाटील यांना सुद्धा अर्थमंत्रीपदाचा प्रस्ताव असल्याची सुद्धा चर्चा समोर आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी घेतलेल्या भेटींमुळे एक प्रकारे यासंदर्भात राष्ट्रवादी आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत थेट चर्चा करू शकतो असे संकेत दिले आहेत का, याचीसुद्धा चर्चा रंगली आहे.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा नव्याने आणण्याची तयारी
दरम्यान, लोकसभेमध्ये पुढील काही दिवस निर्णायक असणार आहेत. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा नव्याने आणण्याची तयारी भाजपकडून केली जातेय. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून फोडाफोडी सुरू होती आणि या फोडाफोडीमध्ये शरद पवारांचे खासदार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. जंतर-मंतरवरचे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेटसुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरला होता.