मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला असतानाच दुसरीकडे अजित पवार गटात मात्र राजकीय हालचाली सुरूच आहेत. सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून पक्षाच्या आमदारांशी संपर्क साधून विलीनीकरणाबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच खासदार पार्थ पवार यांनी पुण्यात आमदारांची बैठक बोलावल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार गटातील काही ज्येष्ठ नेत्यांनी वेळ मागितल्याचे वृत्त, प्रफुल्ल पटेल यांच्यासह नेत्यांच्या भेटीगाठी आणि सत्ताधारी गटातील अंतर्गत हालचालींमुळे विलीनीकरणाची चर्चा रंगली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे २० ते २२ आमदार पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत असून ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. हे आमदार केवळ गप्पा मारण्यासाठी शरद पवार यांना भेटत नाहीत, असेही राऊत म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुजोरा दिलेला नाही.
या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना विलीनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्यासाठी हा विषय संपला असून, सध्या विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर या विषयाला आपण पूर्णविराम दिला, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही विलीनीकरणाच्या सध्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे म्हटले आहे. यापूर्वी अजित पवार यांच्या हयातीत १२ फेब्रुवारीला दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण होणार होते, असा दावा तटकरे यांनी केला होता.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शरद पवार गटाकडून संपर्क साधण्यात आला आहे का, विलीनीकरणाबाबत तुमची भूमिका काय आहे आणि पक्षातील सध्याच्या घडामोडींबाबत तुमचे मत काय, अशी विचारणा आमदारांना करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पार्थ पवार यांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीसाठी पुणे जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, शंकर मांडेकर आणि माऊली कटके यांच्यासह आमदारांच्या उपस्थितीची वृत्ते प्रसिद्ध झाली.
मात्र, बैठकीनंतर आमदार शरद मांडेकर यांनी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही केवळ तीन आमदार होतो. तीन आमदार विलीनीकरणाबाबत चर्चा कशी करणार? पार्थ पवार यांनीही या विषयावर काही भाष्य केले नाही. सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलो होतो. मुळशी तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश न झाल्याचा प्रश्न आणि स्थानिक विकासकामांबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करायचा होता, असे मांडेकर यांनी सांगितले. विलीनीकरणाबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाचा विषय संपल्याचे सांगितले, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांची मते जाणून घेण्याचे प्रयत्न आणि पार्थ पवार यांच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनी केलेला २० ते २२ आमदारांचा दावा, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्याचे खंडन आणि आमदारांच्या बैठकीनंतर समोर आलेली वेगळी भूमिका, यामुळे या चर्चांना अधिकच गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार की अजित पवार गटातील काही आमदार शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षात परतणार, याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.