सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दहिगाव येथे दोन दिवसांपूर्वी वीज पडून झालेल्या दुर्दैवी घटनेत स्व. मनोहर दुधे व त्यांच्या पत्नी स्व. पार्वताबाई दुधे यांचे अकस्मात निधन झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर भाजपचे पूर्व जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर व पंचायत समिती सभापती अनिता बनकर यांनी दुधे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्या दुः खात सहभागी होत कुटुंबीयांना धीर दिला.
एकाच कुटुंबातील पती पत्नीचे अशा प्रकारे अकस्मात निधन होणे ही अत्यंत वेदनादायी व मन हेलावून टाकणारी घटना आहे. या प्रसंगी दुधे परिवाराची भेट घेऊन त्यांच्या दुःखाची विचारपूस केली. तसेच या कठीण प्रसंगी संपूर्ण दुधे परिवाराच्या पाठीशी असल्याचे सुरेश बनकर यांनी सांगितले.
यावेळी स्व. मनोहर दुधे व स्व. पार्वताबाई दुधे यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी आणि दुधे परिवारास हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती व धैर्य मिळावे, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली. दुःखाच्या या कठीण प्रसंगी दुधे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी असून, परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य तुळशीराम सागरे, माजी सरपंच वसंत विसपुते यांच्यासह दहिगाव येथील गावकरी मंडळी व दुधे परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.















