सुसाट कंटेनरने मजुरांना चिरडले

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः जेसीबीच्या सावलीत जेवण करणार्‍या सहा मजुरांना भरधाव कंटेरने अक्षरशः चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर वडखा-नाथनगर शिवारात चॅनल क्र. ४०६ जवळ घडली. या अपघातानंतर जवळपास अर्धा तास समृद्धी महार्गावरील एका बाजूची वाहतूक थांबवली होती.
गणेश सांडू कसारे (२७, रा. नायगाव), राहुल राम गिरी (३१, रा. परतूर, जि. जालना) आणि वीरेश्वर विश्वकर्मा (३२, रा. मोहू, उत्तर प्रदेश), अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. ज्ञानेश्वर सोमनाथ घोरपडे (२६, रा. पोखरी), राम गोपाल पटेल (३१, रा. मध्य प्रदेश) आणि शैलेंद्र बिजेंद्र रॉय (२८, रा. पश्चिम बंगाल) हे तिघे जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी महामार्ग पोलीस, चिकलठाणाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पवार, उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे यांनी पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कंटेनरचालक पळून गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजपूत यांनी दिली.