संशयकल्‍लोळ : भाजपचे ’मिले सूर मेरा तुम्हारा’ तर एमआयएम मवाळ

Foto
कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व भाजप नेते उद्धव सरकारवर तुटून पडत असताना औरंगाबादेत मात्र भाजपचे मिले सुर मेरा तुम्हारा सुरू आहे. दोन दिवस पार पडलेल्या राजकीय नेत्यांच्या बैठक सत्रात सत्ताधारी शिवसेना -राष्ट्रवादीच्या सावध तर एमआयएमच्या मवाळ भूमिकेने संशय कल्लोळ वाढला आहे.
कोरोना संसर्गाचे तीन महिने या विषयावर सध्या वातावरण तापले आहे. दोन दिवस लोकप्रतिनिधी च्या बैठकांचे सत्र सुरू होते. यात सर्वात गोची झाली ती भाजप आणि एमआयएमची. शहरावर शिवसेनेची सत्ता आहे तर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री अशा परिस्थितीत भाजपने टोकदार भूमिका घेत हल्लाबोल करेल अशी अपेक्षा होती. आतापर्यंत घाटी रुग्णालय खाजगी रुग्णालय यांच्याविरोधात ऊर बनवणार्‍या एमआयएमच्या खासदारांकडूनही प्रचंड आकांडतांडव होण्याची अपेक्षा होती. मात्र असे काही घडलेच नाही. अपेक्षेप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार सावध भूमिका घेताना दिसले. राज्यभर सरकार विरोधात राळ उठवीत उद्धव सरकार अपयशी ठरल्याचे आरोप भाजप नेते करीत आहेत. शहरात संसर्गाची परिस्थिती गंभीर असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चिंता व्यक्त केली आहे. राज्यात विरोधी पक्षांचे सरकार तर स्थानिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा. अशा परिस्थिती नेतेमंडळींनी सत्ताधार्‍यांच्या सुरात सूर मिळवला आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले.
एमआयएम ही मवाळ
जिल्ह्यात एमआयएम चा खासदार आहे. एमआयएम कार्यकर्त्यांनी गेल्या दोन-तीन महिन्यांच्या काळात घाटी प्रशासनावर आरोप करीत आंदोलनाचा इशाराही दिला होता. कार्यकर्ते दररोज खाजगी रुग्णालय तसेच  सरकारी रुग्णालयांवर आरोप करीत निवेदने देत असतात. अशा परिस्थितीत खा. जलील कठोर भूमिका घेऊन सरकार आणि प्रशासनावर हल्लाबोल करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनीही मवाळ भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.