कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब

Foto
बडनेरा येथील लाजीरवाणी घटना
 करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. मात्र, कोविड टेस्टसाठी अशा प्रकारे गुप्तांगातून स्वॅब घेत नसल्याचे समजल्यानंतर तिने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी लॅब टेक्निशिअन असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अमरावतीतील बडनेरा येथील कोविड टेस्ट लॅबमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आपल्या सहकार्‍याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पीडित तरुणीची करोना चाचणी करायची होती. त्यासाठी ती कोविड टेस्ट लॅबमध्ये गेली. त्यावेळी तेथील टेक्निशिअन तरुणाने तिच्या गुप्तांगातील स्वॅब घेतला. मात्र, करोना चाचणीसाठी गुप्तांगातून स्वॅब घेत नसल्याचं तरुणीला डॉक्टरांमार्फत समजले. त्यानंतर तिनं पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली. यावरून त्याच्याविरोधात बलात्कार आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पेश देशमुख असे या 30 वर्षीय आरोपीचे नाव असून  तो पुसदचा आहे.
पीडित तरुणी ही एका मॉलमध्ये नोकरी करते. ती आपल्या भावाकडे राहते. ती ज्या मॉलमध्ये नोकरी करते, तेथील एका कर्मचार्‍याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचार्‍यांचे स्वॅब घेण्यात आले. 28 जुलै रोजी या तरुणीचे स्वॅब घेण्यात आले. मात्र, त्यानंतर अल्पेश याने या तरुणीला पुन्हा लॅबमध्ये बोलावले. तुमचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे असे तिला सांगितले. तसेच तुम्हाला युरिनल चाचणी करावी लागेल, अशी बतावणी त्याने केली. लॅबमध्ये नमुने घेण्यासाठी महिला कर्मचारी नाही का अशी विचारणा तिने केली असता तुम्ही एखाद्या महिलेला सोबत घेऊन येऊ शकता, असे सांगितले.  लॅबमध्ये आरोपीने तिच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणीसाठी घेतले. मात्र, करोना चाचणीसाठी गुप्तांगातून स्वॅब घेतल्यावर तिला शंका आली. तिने आपल्या भावाला याबाबत सांगितले. त्याने एका डॉक्टरला याबाबत विचारणा केली. अशा प्रकारे चाचणीसाठी स्वॅब घेतले जात नसल्याचे त्याला डॉक्टरांनी सांगितले. तिने या प्रकरणी लॅब टेक्निशिअनविरोधात बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker