टीव्हीके भाजपसोबत एनडीए आघाडीचा भाग होऊ शकते, अफवांना स्वतः विजय यांनी फेटाळून लावले !!

Foto
चेन्नई  : देशात पुन्हा एकदा निवडणुकांची धामधूम सुरू होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून आघाड्यांचे गणित जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विजय यांच्या टीव्हीके पक्षाला एनडीएमध्ये आणण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, अभिनेता विजयचा पक्ष भाजपाशी युती करण्यास तयार नसल्याचे म्हटले जात आहे. भाजपाने दिलेली दिलेली ऑफर विजयला मान्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

तामिळनाडू विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पक्ष, तमिलगा वेट्टी कझगम (टीव्हीके) आणि भाजपा यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. भाजपाने विजय यांना युतीत सामील होण्यासाठी एक महत्त्वाची ऑफर दिली आहे. भाजपाने विजय यांच्या पक्षाला ८० जागा देऊ केल्या आहेत. याशिवाय, भाजपाने विजय यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतु, काही रिपोर्टनुसार, विजय यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे आणि यामुळे चर्चेत अडथळे निर्माण होत आहेत. यानंतर आता विजयने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नाहीत

थलपथी विजय यांचा पक्ष तमिलगा वेट्टी कझगम (टीव्हीके), तमिळनाडू विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले जात आहे. टीव्हीकेने आता स्पष्टपणे सांगितले आहे की, ते कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नाहीत. अभिनेते-राजकारणी विजय यांनीही या अफवांना खोटा प्रचार संबोधून फेटाळून लावले आहे. परंतु, टीव्हीके नेते आधव अर्जुन यांनीही एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव नाकारल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रस्तावात विजय यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा समावेश होता. तसेच टीव्हीके भाजपसोबत एनडीए आघाडीचा भाग होऊ शकते, या जोरदार अफवांना स्वतः विजय यांनी फेटाळून लावले.

दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्हीकेने असा दावा केला की, एका पक्षाकडून विजय यांना मुख्यमंत्रीपद आणि ९० जागा देऊ केल्या आहेत. टीव्हीके नेते अधव अर्जुन यांनी प्रस्ताव देणाऱ्या पक्षाचे नाव सांगितले नाही. विजयने हा प्रस्ताव नाकारला आहे. त्यांनी आम्हाला ५० ते ९० जागांपर्यंत सर्व प्रकारचे प्रस्ताव दिले. पण विजयने फक्त एवढेच सांगितले की त्याला पद नव्हे, तर लोकांचा विश्वास हवा आहे, असे टीव्हीके नेते म्हणाले.