घरकुल, सिंचन विहीर, गाय गोठेसह विविध योजनांचा लाभ घ्यावा

Foto
सभापती अनिता बनकर यांचे आवाहन

सिल्लोड, (प्रतिनिधी): विविध गावांमध्ये १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभांमध्ये गावातील विविध विकासकामे, शासकीय योजना तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांनी ग्रामसभेला आवर्जून उपस्थित राहुन आपल्या नावाचा कृती आराखडा मध्ये सामवेश करून घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती अनिता सुरेश बनकर यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील १४ हजार घरकुलाचे प्रतिक्षा यादी ज्या त्या संबंधित ग्रामसेवक यांच्याकडे पाठविली आहे. या यादीचे वाचन ग्रामसभेत होणार आहे. विविध योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे व पक्के घर मिळावे यासाठी घरकुल योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

तालुक्यातील काही पात्र लाभार्थी अद्याप घरकुलाच्या लाभापासून वंचित असतील किंवा त्यांचे नाव घरकुलाच्या यादीत समाविष्ट झालेले नसेल, तर त्यांनी ग्रामसभेत उपस्थित राहून आपले नाव नोंदवावे. तसेच घरकुलासाठी पात्र असलेल्या कुटुंबांनी आपली माहिती ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सिंचन विहीर, गायगोठा तसेच इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनीही ग्रामसभेत उपस्थित राहून नवीन कृती आराखड्यामध्ये आपली नावे समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव द्यावेत.

ग्रामसेवकांशी संपर्क करावा. गावातील पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभमिळविण्यासाठी ग्रामसभेचा योग्य पद्धतीने उपयोग करून घ्यावा, ग्रामसभा ही गावाच्या विकासाचा महत्त्वाचा मंच आहे. आपल्या गावातील विकासकामे, शासकीय योजनांचा लाभ आणि नागरिकांच्या समस्या याबाबत थेट चर्चा करण्याची संधी ग्रामसभेत मिळते. 

त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ग्रामसभेत सहभागी होऊन आपला हक्क व आपली समस्या मांडावी, तालुक्यातील ग्रामस्थांनी दि. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान गावात आयोजित होणाऱ्या ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, पात्र लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांसाठी आपली नावे ग्रामसभेत द्यावीत, असे आवाहन सभापती अनिता सुरेश बनकर यांनी केले आहे.