दुष्काळ, पाणीटंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना करा

Foto
खा. संदीपान भुमरे यांच्याकडे मागणी 

खुलताबाद, (प्रतिनिधी) : तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाचे अनियमित प्रमाण आणि पावसातील मोठ्या खंडामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनासमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता आहे. 

दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात तसेच विहिरी, बोअरवेल व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू वरकड यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा घेऊन कृती 
आराखडा तयार करावा. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. जलसंधारण, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, शेततळे, बंधारे दुरुस्ती आणि जलपुनर्भरणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी निवेदनात केली. 

वनक्षेत्र असलेल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चर खोदून पाणी अडविण्यासाठी कामे करावीत. विहिरी, बोअरवेल आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. पाणीटंचाईच्या काळात जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चार्याची उपलब्धता होण्यासाठीही नियोजन करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

पाणीटंचाई व रोजगार हमीच्या कामांचा ग्रामपंचायत स्तरावर नियमित आढावा घेऊन त्याचा अहवाल प्रशासनाला सादर करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन या सर्व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी. शेतकरी, शेतमजूर, नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख राजू वरकड यांच्या मार्गदर्शनाखाली बद्रीनाथ वाकळे, आकाश हिवर्डे, विजय चव्हाण, विक्की गायकवाड व तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.