मार्चमध्ये २०० कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचे चारशे पारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास आता काही दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत २०८ कोटींची वसुली करण्यात प्रशासनाला यश आले असून, उर्वरित २०० कोटींची वसुली ३१ मार्चपर्यंत करण्यात येईल, असा दावा प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आला आहे.
महानगरपालिका प्रशासनाने गतवर्षाप्रमाणेच आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रित केले. यासाठी प्रशासक काळात आयुक्त जी. श्रीकांत यांनी निवासीच नव्हे तर व्यवसायिक मालमत्ताधारकांनाही थकबाकीच्या शास्तीमध्ये एक महिना ९५ टक्के अन् दुसर्‍या महिन्यात ७५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली. या सवलतीचा सर्वाधिक लाभ हा व्यावसायिक आणि उद्योजक थकबाकीदारांनी घेतला. मात्र सुमारे ४० टक्क्यांहून अधिक निवासी मालमत्ताधारकांनी या सवलतीमध्येही कराचा भरणा केला नाही. त्यामुळे ७०० कोटी वसुलीच्या उद्दिष्टापैकी २०० कोटींची कर वसुली करण्यात यश आले. ही आतापर्यंतची सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. दरम्यान, मालमत्ता करासोबतच यंदा पाणीपट्टी वसुलीसाठी २५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात १०० कोटी रुपये थकबाकीचे आहेत. 
महापालिकेच्या कर वसुली विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १ एप्रिल ते २ मार्चदरम्यान २०८ कोटी ६४ लाख १० हजार २३ रुपयांची कर वसुली झाली आहे. त्यात मालमत्ता कराचे १९० कोटी १८ लाख ५३ हजार ५२८ रुपयांचा समावेश आहे, तर पाणीपट्टीच्या १८ कोटी ४५ लाख ५६ हजार ४९५ रुपयांचा समावेश आहे. आयुक्त जी. श्रीकांत यांनी मार्च अखेरपर्यंत आणखीन दोनशे कोटी रुपयांच्या कर वसूलीचे उद्दिष्ट दिल्याचे कर वसुली विभागाकडून सांगण्यात आले आहे.