मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने तहलका मासिकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना मोठा धक्का दिला. न्यायालयाने म्हापसा सत्र न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निर्णय रद्द करत तेजपाल यांना लैंगिक छळ आणि बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. या निर्णयामुळे गेल्या १० वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, आता तेजपाल यांच्या शिक्षेसंदर्भात न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने गोवा सरकारने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेले अपील मंजूर केले. नोव्हेंबर २०१३ मध्ये एका कनिष्ठ महिला सहकार्याने तेजपाल यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा आरोप केला. या प्रकरणात सत्र न्यायालयाने तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली. परंतु, उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला. उच्च न्यायालयाने तरुण तेजपाल यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(एफ) आणि ३७६(२)(के), कलम ३५४-अ आणि ३५४-ब कलमांनुसार दोषी ठरवले. न्यायालयाच्या निकालानंतर तरुण तेजपाल यांना काय शिक्षा सुनावली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमके प्रकरण काय?
नोव्हेंबर २०१३ मध्ये पीडिताने तरुण तेजपाल यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले. १८ नोव्हेंबर रोजी पीडितेने ही बाब व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर १९ नोव्हेंबरला तेजपाल यांनी पीडितेची ई-मेलद्वारे माफी मागितली. दरम्यान, पीडितेने या प्रकरणाच्या चौकशीसाठी मविशाखा मार्गदर्शक तत्त्वांफनुसार अंतर्गत लैंगिक छळ प्रतिबंधक समिती स्थापन करण्याची मागणी केली. चौकशी निष्पक्षपणे पार पडावी, यासाठी तेजपाल यांनी सहा महिन्यांसाठी संपादकपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, २२ नोव्हेंबर २०१३ रोजी हे प्रकरण राष्ट्रीय माध्यमांमध्ये समोर आल्यानंतर गोवा पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
म्हापसा सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द
अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ३० नोव्हेंबर २०१३ रोजी तरुण तेजपाल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर जुलै २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. सप्टेंबर २०१७ मध्ये सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात आरोप निश्चित केले आणि दोन्ही पक्षांची गोपनीयता जपण्यासाठी खटल्याची सुनावणी बंद दाराआड घेण्यात आली. सरकारी पक्षाने ७१ साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, ई-मेल्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायालयात सादर केले. तरीही २१ मे २०२१ रोजी म्हापसा सत्र न्यायालयाने तरुण तेजपाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा निर्णय रद्दबातल ठरवत त्यांना दोषी घोषित केले आहे.