नोकरीच्या आमिषाने शिक्षिकेची चौदा लाखांची फसवणूक

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून शिक्षिकेची १३ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक झाली. सासू-जावयाला शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली. गंगापूर न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

 अमित वालचंद चाटे, त्याची सासू इंदुबाई बनसोडे (दोघे रा. दिशानगरी, छत्रपती संभाजीनगर) अशी संशयितांची नावे आहेत. लासूर स्टेशन येथील शिक्षिका प्रतिभा श्रीराम खदळे (वय ३५) यांना घाटी रुग्णालयात प्रयोगशाळा सहायक व ग्रंथपाल पदावर नोकरी देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले होते. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी प्रतिभा यांना थेट मुंबईत मंत्रालयात नेले. 

मंत्रालयाबाहेर उभे करून स्वतः आत जाऊन कागदपत्रे जमा करण्याचे नाटक आरोपींनी केले. बनावट रुजू पत्र, प्रशिक्षण आदेश, तिजोरीत पैसे भरणे आणि कर जमा करण्याच्या नावाखाली २३ ऑगस्ट ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ऑनलाइन व रोख स्वरूपात सुमारे १४ लाख रुपये उकळले. 

आदेशपत्र संशयास्पद वाटल्याने प्रतिभा यांनी घाटी रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता, अमित चाटे नावाचा कर्मचारी कार्यरत नसल्याचे उघड झाले.