फुलंब्री, (प्रतिनिधी) तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विविध गॅस एजन्सींची अचानक तपासणी केली. बहुतांश केंद्रांवर सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आवाहन तहसीलदार योगिता खटावकर असे यांनी केले आहे.
तहसीलदार योगिता खटावकर व पुरवठा निरीक्षक अनुराधा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. पथकाने विविध केंद्रांवर जाऊन साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी केली. यामध्ये फुलंब्री येथील सुंदर इंडियन गॅस एजन्सीकडे ४२१, आळंद येथील सारा एच.पी. गॅसकडे ८२, तर बाबरा येथील काथार गॅस एजन्सीकडे २९५ सिलिंडर उपलब्ध असल्याचे आढळले. पिरबावडा येथील एजन्सी बंद असली तरी त्यांच्याकडे १५० सिलेंडरचा साठा असल्याची नोंद करण्यात आली आहे.
वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे निर्देश सर्व एजन्सींना देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे गॅस टंचाईबाबतच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. फुलंब्री तालुक्यात सध्या गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे. नागरिक विनाकारण घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी करू नका. गॅस वितरण सुरळीत सुकू असून, कोणीही अफवा पसरवू नयेत.
- योगिता खटावकर, तहसीलदार, फुलंब्री












