खामेनेईंच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेत प्रचंड तणाव; इराणने 9 देशांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले

Foto
नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर मोठ्या प्रमाणावर संयुक्त लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेने या मोहिमेला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’, तर इस्रायलने ‘लायन्स रोर’ असे नाव दिल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई ठार झाले असून, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांसह अनेक वरिष्ठ लष्करी कमांडरही मारले गेल्याचे वृत्त आहे.

या घडामोडींनंतर मध्य-पूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली असून, इराणने प्रत्युत्तरात्मक कारवाई करत या प्रदेशातील अमेरिकन व सहयोगी देशांतील लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणने बॅलिस्टिक मिसाइल्स, क्रूझ मिसाइल्स आणि सुसाइड ड्रोन वापरून मध्य-पूर्वेतील अनेक देशांवर हल्ले केले. मध्य-पूर्वेत एकूण 17 देश असून, त्यापैकी 9 देशांवर इराणने हल्ले केल्याचा दावा आहे.


इस्रायल

इराणने तेल अवीव, जेरुसलेमसह प्रमुख शहरांतील लष्करी तळ व एअरबेस लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. नेवातिम, हत्झेरिम आणि रामत डेविड हे एअरबेस निशाण्यावर होते. इस्रायली लष्करानुसार, आयरन डोम आणि एरो डिफेन्स सिस्टिमने बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच पाडली.

सौदी अरेबिया

इराणने राजधानी रियाध, पूर्व प्रांत तसेच जाझान व खमीस मुशायत परिसरातील किंग फहद एअरबेस लक्ष्य केल्याचे सौदी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

कतार

इराणने 65 क्षेपणास्त्रे आणि 12 ड्रोन डागण्यात आल्याची कतारने पुष्टी केली. याशिवाय, अल उदैद येथील अमेरिकी लष्करी तळांवरही हल्ले करण्यात आले.

बहरीन

राजधानी मनामामधील अमेरिकी नौदलाच्या 5व्या फ्लीटचे मुख्यालयावर इराणनने हल्ला केला. याशिवाय क्राउन प्लाझा हॉटेलवर ड्रोन कोसळल्याची माहिती आहे.

कुवैत

अली अल-सालेम एअरबेसवर बॅलिस्टिक मिसाइल हल्ले झाले, मात्र हवाई संरक्षण प्रणालीने ते निष्प्रभ केले. कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ल्यात काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले.


संयुक्त अरब अमिराती

अबू धाबीमध्ये अनेक क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आली; किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुबईतील बुर्ज अल अरब, द पाम परिसर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्ष्य झाल्याचा दावा आहे. इराणने UAE वर 209 ड्रोन आणि 137 क्षेपणास्त्रे डागल्याचे रिपोर्ट्स सांगतात.

जॉर्डन

जॉर्डनने आपल्या हवाई हद्दीत घुसलेल्या दोन क्षेपणास्त्रांना पाडल्याचा दावा केला आहे.

इराक

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इरबिल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील अमेरिकी ठिकाणांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे.

ओमान

इराणने ओमानवरही हल्ला केल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

परिणाम आणि जागतिक चिंता

तज्ज्ञांच्या मते, हा संघर्ष प्रादेशिक युद्धात रूपांतरित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम जागतिक तेल पुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग आणि कूटनीतिक संबंध यांवर गंभीरपणे होऊ शकतो.