पंचवटी चौकात भीषण अपघात; दोन महिला ठार, दोघी गंभीर

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः मध्यप्रदेशात देवदर्शन करून शहरात परतलेल्या दोन महिला पंचवटी चौकात झालेल्या अपघातात ठार झाल्या. ट्रव्हल्स बसची डीक्की उघडी राहिल्याने रिक्षा त्याला घासली असे बोलले जाते. आज पहाटे 330ः ते 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेत दोन महिलाही जखमी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. याबाबत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशाबाई राजू चव्हाण (वय 35) रा. सराफा गल्ली, जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे वाळूज आणि लता राजू परदेशी (वय 47) रा. सराफा गल्ली वाळूज अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातील सहा ते सात महिला रविवारपासून मध्यप्रदेशात देव दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या काल रात्री उशीरा शहरात  परतल्या. पंचवटी चौकातून वाळूजला जाण्यासाठी त्या रिक्षाची वाट पाहत होत्या. त्यानंतर त्यांनी एक रिक्षा (क्र. एमएच 20 ईएफ 2555) ठरविली आणि त्या वाळूजला परत जात होत्या. कर्णपुरा रोडवर हा अपघात झाला.

रस्त्यावर रक्ताचा सडा...

काही कळण्याच्या आतच हा अपघात घडला. त्यावेळी रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्याने रक्ताचा सडाच रस्त्यावर पडला होता. महिलांचा आरडा ओरडा ऐकून अनेकांनी तिकडे धाव घेतली. जखमी महिलांना घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आशा चव्हाण आणि लता परदेशी यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. इतर दोन जखमी महिलांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅव्हल्सची डिक्की उघडी 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स (क्र.एमपी 09 एके 8016) याच ट्रॅव्हल्सने वाळूज परिसरातील सात जणी मध्यप्रदेशात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. पंचवटी चौकात त्या सर्वजणी उतरल्या. उतरल्यानंतर रिक्षाने वाळूजला जाण्यासाठी त्या रिक्षात बसल्या. त्याचवेळी ट्रॅव्हल्सची डिक्की उघडी राहिली. या उघड्या डिक्कीला रिक्षा घासली अन टोकदार पत्रा रिक्षाचे टफ कापून महिलांच्या डोक्याला लागला. अचानक घडलेल्या या अपघातात दोन्ही महिलांच्या डोक्याला जबर मार लागला. तर दोन महिला जखमी झाल्या आहेत.