जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकर्‍यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना

Foto
पुणे :  आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनसाठी राज्यभरातून पालख्या निघाल्या आहेत. आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी चालत पंढरीच्या दिशेने जात असतात. या आषाढी वारीला गालबोट लावणारी एक घटना सोमवारी सकाळी घडली आहे. जेजुरीत वारकर्‍यांच्या भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकर्‍यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर १५ ते १६ वारकरी जखमी असल्याची माहिती आहे. या अपघातातील मयतांमध्ये राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार यांचा समावेश आहे. 

ज्या ट्रकने वारकर्‍यांना उडवले तो ट्रक वारकर्‍यांचे सामान वाहून नेणारा होता. या अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी परिसरातील भोंगळे मळा वारकर्‍यांच्या अपघात झाला. यावेळी एका ट्रकने वारकर्‍यांच्या टेम्पोला धडक दिल्याचे समजते. यामध्ये १५ ते १६ वारकरी जखमी झाले होते. हे वारकरी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत जात असताना हा प्रकार घडला. यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला असून आणखी काही वारकर्‍यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ज्ञानोबा माऊलींची पालखी काल जेजुरी मुक्कामी होती. सासवडचा मुक्काम संपल्यानंतर आज पालखी जेजुरीत येणार आहे. आज सकाळी वारकर्‍यांनी जेजुरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. या रस्त्याला एका बाजूने वाहने सोडली जात आहेत. यापैकी एका ट्रकने मागून  वारकर्‍यांना धडक दिल्याची माहिती आहे. या वारकर्‍यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून तिघांची प्रकृती गंभीर होती. यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. 

आज सकाळी ज्ञानोबा माऊलींची पालखी सासवडहून जेजुरीला जाणार आहे. या पालखीच्या आधी काही वारकरी पुढच्या मुक्कामाच्या दिशेने निघतात. आज सकाळी हे वारकरी रस्त्यावरुन चालत असताना सामान वाहून नेणार एक ट्रक वारकर्‍यांच्या गर्दी शिरला. या ट्रकने पाठून सहा वारकर्‍यांना जोरदार धडक दिली. हे सर्व वारकरी आनंदाच विठुनामाचा गजर करत चालत होते. मात्र, या अपघातानंतर घटनास्थळी किंकाळ्या आणि रडण्याचे सूर ऐकायला येत होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. वारकर्‍यांना धडक देणारा ट्रक अचानक अनियंत्रित कसा झाला, प्रशासनाने यासाठी काळजी घेतली नव्हती का, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.

तापाच्या गोळ्यांमुळे ट्रकचालकाला ग्लानी आली अन् अनर्थ घडला
हा ट्रक नांदेडमधील आहे.  वारीसाठीच शिधा मटेरिअल घेऊन जाणार्‍या ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रॅक्टर चालवणार्‍याला तापाच्या गोळ्या घेतल्याने ग्लानी आली आणि त्यानंतर  त्याचा ताबा सुटला. तीन मृत महिला या सांगलीच्या आहेत. जेजुरीजवळच्या सासवडे गावात हा अपघात घडल्याची माहिती जेजुरीचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एक ट्रक अचानक दिंडीत घुसला. या दुर्घटनेत १५ ते १६ वारकरी जखमी झाले आहेत. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत महिला सांगलीच्या दिग्रस परिसरातील असल्याचे मंगेश घोणे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड-जेजुरी मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या वेळी त्यांनी जखमी वारकर्‍यांची विचारपूस केली; तसेच पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. जखमींवर तातडीने व सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यात यावेत; तसेच आवश्यक ती सर्व मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकर्‍यांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या वेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. राज्य शासन या दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांसह व जखमी वारकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.