माणिकनगरजवळ भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील माणिकनगर येथे अज्ञात वाहनाने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले. 

ही घटना रविवारी (दि. १५) रात्री साडेआठच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरजळगाव महामार्गा वरील माणिकनगरजवळील हॉटेल राहुलसमोर घडली. सीताराम देवराव पालोदकर (वय ६०, रा. पालोद) असे मृताचे नाव असून सुरेश हिंगमिरे (३५) व ईश्वर सुरडकर (३१, दोघेही रा. पालोद) हे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही एमएच-१७ टी-१३८५ क्रमांकाच्या कारने माणिकनगरकडून सिल्लोडकडे जात होते. दरम्यान, हॉटेल राहुलजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की कारच्या मागील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. 

गंभीर जखमी झालेल्या सीताराम पालोदकर यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे पालोद पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी शोकाकुल वातावरणात सीताराम पालोदकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे. दरम्यान, या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बीट जमादार दीपक इंगळे करीत आहेत.