दिल्लीत अतिरेकी हल्ल्याचा कट; दहशतवाद्यांच्या निशाण्यावर प्रमुख मंदिर आणि मार्केट, अलर्ट जारी

Foto
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. गोपिनय माहितीनुसार, दिल्लीतील चांदणी चौकातील एका मंदिरासह भारतातील प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला, चांदणी चौक परिसरातील मंदिरे लष्कर-ए-तैय्यबाच्या निशाण्यावर असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असला तरी मोठे मंदिर आणि बाजारपेठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतातील मोठ्या शहरांमध्ये लष्कर-ए-तैयबाकडून आयईडी हल्ल्यांची योजना आखली जात आहे. यात दिल्लीतील चांदणी चौक परिसरातील एका मंदिराचा समावेश आहे. लाल किल्ल्याबाहेर काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्फोटानंतर हा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी स्फोटकांनी भरलेल्या एका कारचा स्फोट झाला होता. ज्यामध्ये १३ लोकांचा मृत्यू झाला आणि बारा लोक जखमी झाले होते.