ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल, परभणीला गद्दारीची पार्श्वभूमी, खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे मराठवाड्यात दाखल...

Foto
परभणी : आपल्या पक्षातील सहा खासदारांच्या फुटीनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन तेथील जनतेशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी आपल्या परभणी दौर्‍यात महायुतीवर हल्ला बोल करीत मागील अनेक वर्षांपासून परभणीला फुटीची आणि गद्दारीची पार्श्वभूमी असल्याचे पहावयास मिळाले. मात्र, येथील मतदार कायम शिवसेने सोबत असल्याचा अभिमान देखील वाटतो असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.


पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौर्‍यावर आले असून शनिवारी रात्री त्यांचे परभणी जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी सकाळी त्यांनी पत्र परिषदेतून भूमिका मांडली. याप्रसंगी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, महापौर सय्यद इकबाल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, मुळात गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे. याशिवाय महाराष्ट्र व देश वाचणार नाही. हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र असल्याचेही दिसून येते.
 
खाजगी निधीसाठी तिकडे गेले 
उद्धव ठाकरे खासदारांच्या गद्दारीवर म्हणाले, या सर्व मतदारसंघात लक्ष दिले असते तर गद्दारांच्या भानगडी कळाल्या  असत्या. आमच्या सोबत राहण्याची शपथ घेऊन सुद्धा ती शपथ मोडल्याचे दुष्परिणाम त्यांना दिसून येतील. खाजगी निधीसाठी खासदार तिकडे गेले. मिळालेला खासदार निधी कुठे खर्च केला, किती वेळेला लोकसभेत हजेरी लावली, मंत्र्यांना विकास कामासाठी भेटले, याचा अहवाल आमच्याकडे आहे. 

सगळीकडे फुटाफुटी, जनतेकडे दुर्लक्ष 
सध्याची परिस्थिती पाहता देशाच्या कोणत्याच राज्यात संतोष नाही. नीट पेपर फुटला, आता टीईटी पेपर फुटला, तिकडे खासदार फोडत आहेत, त्यामुळे सगळीकडे फक्त फुटाफुटी एवढेच आहे. जनतेच्या प्रश्नाकडे, शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीकडे यांचे लक्ष नाही. 

ऑपरेशन देवेंद्र आणि भाजपमधील गटबाजी
शिवसेना फोडण्यामागे भाजपमधील अंतर्गत गटबाजी असू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र असू शकते. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर त्यांच्या पंतप्रधान पदाची संधी निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच गुंतवून ठेवण्यासाठी किंवा संपवून टाकण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी ही खेळी केली असू शकते, असा संशय ठाकरे यांनी व्यक्त केला. सध्याच्या महायुती सरकारला लोकांमध्ये मराठा-मराठेतर करायचं, जातीपातीत संघर्ष निर्माण करायचा आणि सुख नाही व सत्ता भोगायची आहे, असा घणाघात त्यांनी केला. सध्याच्या सरकारच्या कर्जमाफी आणि आपल्या सरकारच्या कर्जमुक्तीमधील फरक त्यांनी स्पष्ट केला. ते म्हणाले, माफी ही गुन्हेगाराला दिली जाते शेतकर्‍याला नाही. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे या भावनेतन मी केलेली ती कर्जमुक्ती होती. त्यांनी कोणत्याही अटी-शर्तींविना दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केल्याची आठवण करून दिली.