छत्रपती संभाजीनगर : मराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडलं, आज आता मतमोजणी सुरू आहे, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात भाजप सध्या तब्बल 905 जागांवर आघाडीवर असून, सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर असून, शिवसेना शिंदे गट 223 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसचे उमेदवार 187 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. छत्रपती संभाजीनगर हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा गड मानला जातो, मात्र यावेळी या महापालिकेत कमळ फुललं आहे. तर दुसरीकडे एमआयएमने देखील जोरदार मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला आणखी एक गड गमावला आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार छत्रपती संभाजीनगरात भाजप तब्बल 23 जागांवर आघाडीवर आहे. तर एमआयएमने देखील जोरदार मुसंडी मारली असून, एमआयएमचे उमेदवार 15 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार देखील 15 जागांवर आघाडीवर असून, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केवळ 8 जागांवर आघाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीला देखील या महापालिकेत चांगलं यश मिळालं आहे, वंचित बहुजन आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत.
छत्रपती संभाजीनगरात शिवसेना शिंदे गटाला आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर हा सुरुवातीपासून शिवसेनेचा गड मानला जातो. यावेळी मात्र या गडाला भाजपानं सुरुंग लावला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांची या महापालिकेत प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाहीये, याउलट एमआयएमने मात्र या महापालिका निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. तब्बल 15 जागांवर एमआयएमचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपने आता महापौर पदाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे.
शिरसाटांची दोन्ही मुलं जिंकली
पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यांची मुलगी हर्षदा शिरसाठ प्रभाग क्रमांक 18 मधून विजयी झाली असून, मुलगा सिद्धांत शिरसाट प्रभाग क्रमांक 29 मधून विजयी झाला आहे. एकाच वेळी दोन्ही अपत्यांचा विजय झाल्याने शिरसाट यांची महापालिकेतील ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. दरम्यान, दुसरीकडे अंबादास दानवेंच्या भावाचा राजेंद्र दानवे यांचा पराभव झालाय.
हर्षदा शिरसाट यांची लढत भाजपच्या मयुरी बर्थने यांच्याशी होती. तर सिद्धांत शिरसाट यांची लढत भाजपचे भगवान गायकवाड तसेच ठाकरे गटाचे किशोर साबळे व एमआयएमच्या मोनिका मोरे यांच्यासोबत होती. या निकालांमुळे शिंदे गटासाठी संभाजीनगरमध्ये सत्तेचा पाया अधिक मजबूत झाल्याचं बोललं जात आहे. आगामी महापालिकेतील सत्ता स्थापन, महत्त्वाच्या समित्यांवर वर्चस्व आणि निर्णयप्रक्रियेत शिरसाट यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमदार प्रदीप जयस्वालंचा लेकही आघाडीवर
प्रभाग क्रमांक 15 मधून आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषीकेश जैस्वाल आघाडीवर असून, जैस्वाल गटाची पकड या भागात अजून मजबूत झाल्याचं स्पष्ट होत आहे. ऋषिकेश जयस्वाल यांची लढत भाजपचे मिथुन व्यास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे लक्ष्मीनारायण पाखरिया यांच्याशी झाली.
अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव
छत्रपती संभाजी नगरच्या प्रभाग 16 ड मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांची लढत शिवसेनेचे मनोज बल्लाळ यांच्याशी झाली. या लढतीत अंबादास दानवे यांच्या भावाचा म्हणजेच राजेंद्र दानवे यांचा पराभव झालाय.
दरम्यान प्रभाग सत्रामध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र प्रभाग 25 मध्ये भाजपचे माजी महापौर भगवान घडामोडी यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुलमंडीतील शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली कोरडे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे या भागातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. दरम्यान शहरात एमआयएमचा शिरकाव लक्षणीय ठरला असून पक्षाचे दोन उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
एकूणच, या निवडणुकीतून घराणेशाही विरुद्ध कार्यकर्ते राजकारण हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, स्थानिक पातळीवर सत्ताधारी गटांचा प्रभाव किती खोलवर आहे, हे निकालांनी स्पष्ट केलं आहे. महापालिकेतील पुढील राजकीय घडामोडींसाठी हे निकाल अत्यंत निर्णायक मानले जात आहेत.