..तो बिबट्याचा फोटो अजिंठ्याच्या डोंगरातला !

Foto
अफवाविरांचा वनविभागाला ताप !
 साताऱ्याच्या डोंगराच्यावर बिबट्या दिसल्याचे फोटो व्हायरल करून अफवावीरांनी शहरात एकच खळबळ उडवली आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच वन विभागही सतर्क झाला असून सदर फोटो अजिंठा डोंगराच्या परिसरातील असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर कालपासून बिबट्याच्या फोटोने धुमाकूळ घातला आहे. सातारा परिसरातील डोंगरावर रेणुकामाता कमानीच्या पुढे बिबट्याचा वावर असल्याचा असल्याची टूम काही अफवावीरांनी पसरवली. हातोहात सोशल मीडियावर फोटो व्हायरल ही झाले. शहरालगत बिबट्या आल्याने नागरिकात एकच घबराट पसरली. वन विभागाला मात्र याचा मोठा ताप झाला. अधिकाऱ्यांना फोनवर फोन सुरू झाले. औरंगाबाद परिक्षेत्राचे उपवन संरक्षण सतीश वडस्कर यांनी या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले. शहर लगतच्या सर्व परिसरात  कॅमेरे लावून वॉच ठेवण्यात आला आहे. अजून कोणत्याही कॅमेऱ्यात बिबट्या आढळल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सध्या डोंगर-दऱ्या बहरल्या आहेत. झाडाझुडपांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे  वन्य पशु मुक्त संचार करीत आहेत .अशा परिस्थितीत  नागरिकांनी जंगलात फिरण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. 
तो फोटो अजिंठा डोंगरातला !
वन विभागातील कर्मचारी तांबे यांनी सांगितले की, सोशल मीडियावर फिरणारा फोटो अजिंठा डोंगरातला आहे. पंधरा दिवसापूर्वी या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला तोच फोटो आता शहरात व्हायरल होत आहे. सातारा परिसरातील डोंगरावर सर्वत्र कॅमेरे लावले आहेत. आठ दिवसांपासून नियमित वॉच ठेवला जातो आहे. तेथे अजून तरी बिबट्याचा वावर आढळून आलेला नाही. वनराई बहरली असल्याने वन्य प्राण्यांचा संचार वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी दऱ्याखोऱ्यात डोंगरकपारीत तसेच जंगलात जाणे टाळावे असे आवाहन तांबे यांनी केले.