शेतकर्‍यांबाबतचे ’ते’ वक्तव्य भोवले... एकनाथ शिंदे, संजय गायकवाडांवर संतापले, करेक्ट कार्यक्रम करणार?

Foto
मुंबई  : वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असणारे बुलढाण्यातली शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच शेतकर्‍यांबाबत बोलताना एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर टीकेची प्रचंड झोड उठली होती. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गायकवाड यांच्यावर प्रचंड संतापले असून आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शेतकर्‍यांच्या प्रत्येक संकटात शिवसेना मदतीला धावून जाते. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शिवसेनेने व्यापक मदत मोहीम सुरू केली आहे. शेतकरी कुटुंबांतील लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशिन्सचे वाटप केले जात आहे. शेतकर्‍यांच्या मुलींना २५ हजार सायकली दिल्या जात आहेत. दसरा मेळाव्यात शिवसेनेने १०० ट्रक अन्नधान्य दुष्काळग्रस्त भागात पाठवले आहे. गुरुवारी आणखी २४ ट्रक धान्य पाठवण्यात आले. शिवसेना शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ठोस काम करत असताना संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेनेची प्रतिमा नाहक मलीन होत असल्याची पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी देत शिंदे संजय गायकवाड यांच्यावर शिवसेना पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

संजय गायकवाड नेमके काय म्हणाले?
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्या विषयावर उद्विग्न प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. शेतकरी कुटुंबाला वार्‍यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल तर त्याने आमदार, खासदार यांना चिठ्ठी लिहावी. आम्ही सर्व मिळून  त्याची मदत करू. असा सल्लाही आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी दिलाय. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या अंत्यविधीला किंवा मयताला कोणीही जाऊ नये. जेव्हा लोकांना समजेल की, आपल्या मृतदेहाला जनावरे खातात आणि आपल्या मृतदेहाचे काय होते, तेव्हा ते आत्महत्या करणे थांबवतील.  त्यांनी शेतकर्‍यांना आवाहन केले की, काही अडचण असल्यास त्यांनी आत्महत्या न करता सरकारला, आपल्या आमदार किंवा खासदारांना चिठ्ठी लिहून सांगावे. सर्वजण मिळून मदतीला धावून येतील. शेतकरी आत्महत्या करून आपल्या लहान मुलांचे आणि पत्नीचे आयुष्य उद्ध्वस्त करतात, असे संजय गायकवाड यांनी म्हटले होते.

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा
प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवर्यात सापडलेल्या शिंदे सेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी पमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिला. मिनाक्षी शिंदे या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख होत्या. पक्षाच्या अंतर्गत दबावामुळं किंवा इतर कारणांमुळं मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. आता मीनाक्षी शिंदे या ठाणे महापालिकेच्या नगरसेवक म्हणून कार्यरत असतील.