कॉकरोच जनता पार्टीची देशभरात धमाल, संभाजीनगरच्या मराठी मुलाने केली कमाल !! फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही टाकलं मागे

Foto
छत्रपती संभाजीनगर : देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. लोकांनी सुरुवातीला याला गंमत समजलं, पण काही दिवसांतच हा विषय सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. अवघ्या ५ दिवसांत कॉक्रोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर १०० लाख फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. कॉक्रोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकलं. तर काही तासांत काँग्रेसच्या फॉलोअर्सलाही कॉक्रोच जनता पार्टी मागे टाकणार असल्याचं दिसून येत आहे.

काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात. काही बेरोजगार लोक झुरळांप्रमाणे कायदा, प्रसारमाध्यमे आणि आरटीआय चळवळीसारख्या प्रणालींमध्ये घुसखोरी करतात, असं सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले. यानंतर ही टिप्पणी सामान्य बेरोजगार तरुणांना उद्देशून नव्हती, तर बनावट पदव्या असलेल्यांना उद्देशून होती, असं स्पष्टीकरण सूर्यकांत यांनी दिलं. मात्र यादरम्यान, सूर्यकांत यांच्या विधानावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळाला.

कॉकरोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली
मूळच्या छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके मराठमोळ्या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून कॉकरोचजनता पार्टी नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉकरोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहे. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतात जर कोणी तरुणांचाच अपमान केला तर काय होतं याचा प्रत्यय एका चळवळीतून आला आहे.

कोण आहेत अभिजीत दीपके? 
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि संयोजक ३० वर्षीय अभिजीत भगवानराव दिपके हे मूळचे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज महानगर-१ परिसरातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील भगवान शंकर दिपके हे वाळूज एमआयडीसीमध्ये उपभियंता पदावर कार्यरत होते आणि सुमारे एक वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत, तर आई अनिता दिपके या गृहिणी आहेत. अभिजीत यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे ब्रॉडकास्ट जर्नलिझम या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढील उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले असून सध्या बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. राजकीय नॅरेटिव्ह तयार करणे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म हाताळण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यांनी २०२० ते २०२३ या कालावधीत आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले असून, दिल्ली निवडणुकीत भाजपच्या एका घोषणेला उत्तर म्हणून त्यांनी चालवलेले देश के गवारों को, स्कूल भेजो सारों को हे सोशल मीडिया कॅम्पेन अत्यंत गाजले होते. सरन्यायाधीश हे फक्त निमित्त होतं. अनेक वर्षं साचलेला राग कुठूनतरी बाहेर येणारच होता. नव्या पिढीला हिंदू-मुस्लिम, जात-पात हे सगळे भेद नको आहेत. आम्हाला चांगलं शिक्षण, रोजगार आणि नवनवीन तंत्रज्ञान हवं आहे, असं अभिजीत दीपके म्हणाले.

देशातील राष्ट्रीय पक्षांनाही टाकले मागे, केला इन्स्टावर फॉलोअर्सचा विक्रम
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाईला झुरळासमान लेखल्यानंतर त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने अवघ्या पाच दिवसांत सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले आहेत. आज (२१ मे) गुरुवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत, इन्स्टाग्रामवर हा आकडा १०.५ मिलियनआणि ट्विटरवर जवळपास १,६०,००० पर्यंत पोहोचला होता. इन्स्टाग्रामवर भाजपचे ८.७ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेसचे १३.३ मिलियन आहेत. जितक्या वेगाने कॉकरोच जनता पार्टीला प्रतिसाद मिळत आहे तो पाहता तो देशातील अशांत तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा रंगली आहे. अभिजीतने पक्षाचा लोगोही प्रसिद्ध केला आहे. धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी हे त्याचे घोषवाक्य आहे. या पक्षाने अवघ्या एका दिवसात ४५ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली होती. दुसर्‍या दिवशी सरन्यायाधीशांनी आपण असे काहीही म्हटले नसल्याचे स्पष्ट केले.