भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केले : वडेट्टीवार

Foto
नागपूर : भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे  यांच्यातील संबंध ताणले आहे. त्यात एकमेकांना चेकमेट आहे. पूर्णेकर हत्या प्रकरणात जो काही वाद निर्माण झालेला आहे, त्याला भारतीय जनता पक्षाने हवा दिलेली आहे. निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिले, एकमेकांशी संवाद संपला आहे. निधीच्या फायली अडवल्या जात आहे. निधी वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आहे. आता भाजपने ठरवून शिंदे सेनेची जिरवणे सुरू केले आहे. अशी बोचरी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड धुसफूस आहे. तुम्ही नांदा, भांडा, काहीही करा, पण तुमच्या भांडणाचे परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर होऊ नयेत. सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे. दोघांच्या भांडणात सामान्य माणसाचे हाल होत आहेत. खाली कोणाचेही काम होत नाही. नवरा-बायकोसारखे भांडण सुरू असल्याचा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. ते नागपुरात बोलत होते.

दरम्यान, सरकारकडे बहुमत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपली व्यवस्था बरोबर करून ठेवली आहे. मित्रपक्षातील नेतेसुद्धा त्यांच्या संपर्कात आहेत. मला असे वाटत नाही की, सरकार कोसळणार आहे. असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, राज्यातील संकटात सापडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा अवमान करण्याचे काम आमदारांनी केले आहे. हा शेतकर्‍यांचा एवढा मोठा अपमान आहे. सरकारकडून हा अपमान झाल्याचे आम्हाला वाटते. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर सरकार या विधानाशी सहमत आहे का? सरकार सहमत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करावी. या दुःखात शेतकर्‍यांच्या डोळ्यांतील अश्रू दिसत असतील, शेतकर्‍यांबद्दल जाणीव असेल, तर त्यांच्यावर कारवाई करावी. सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे गायकवाड यांच्यावर त्वरित कारवाई करावी.

शेतकर्‍यांची बदनामी करणार्‍या व्यक्तीला आमदार म्हणून राहण्याचा काहीही अधिकार नाही. ज्या पक्षात ते काम करत आहेत, त्या पक्षातून त्यांचे निलंबन केले पाहिजे. पुढील कारवाई सरकारने केली पाहिजे. सरकारने डिसेंबरच्या अधिवेशनात प्रस्ताव आणून त्यांना निलंबित केले पाहिजे. ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही ते अनेकदा खालच्या भाषेत बोलले आहेत. त्यांच्या शब्दांना मर्यादा नाही. अशांची जीभ छाटली पाहिजे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.