भाजपकडून शिंदेसेनेचे एक घाव दोन तुकडे !! परस्पर झाली नावांची घोषणा, महापौरपदी समीर राजूरकर तर उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी काडीमोड घेतलेल्या भाजपने पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला. आपल्या पक्षाच्या समीर राजूरकरांना महापौर पद देताच शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौरपदी वर्णी लावली. पालकमंत्री संजय शिरसाटांना अंधारात ठेवून भाजपने परस्परच उपमहापौर पदाचा शिंदे गटाचा उमेदवार जाहीर केला. या घटनेने भाजप-शिवसेनेत प्रचंड वाद सुरू झाला आहे.

महापालिकेत ५७ जागा जिंकलेल्या भाजप महापौरपदी कुणाची वर्णी लावते याची गेल्या दोन तीन आठवड्यांपासून उत्सुकता होती. बहूमतासाठी अवघी १ जागा कमी असल्याने भाजप राज्यात सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना शिंदे गटाला सोबत घेणार का, हाही कळीचा प्रश्न होता. त्यातच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत दोन्ही पक्षांनी युती केली. त्यामुळे महापालिकेतही दोन्ही पक्ष समन्वय साधणार का, याकडेही राजकीय धुरीणांचे लक्ष होते. मात्र आज अखेर भाजपने शिवसेनेला अंधारात ठेवत दोन्ही नावे जाहीर केली. भाजपने शिंदे गटाच्या राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौरपद देत असताना पालकमंत्री संजय शिरसाट यांचे समर्थक मात्र अनभिज्ञ होते. इकडे जंजाळ यांची शहरभर चर्चा होत असताना पालकमंत्री आणि त्यांचे समर्थक मात्र असे काहीच झाले नाही, उपमहापौर पदासाठी तीन नावे शर्यतीत आहेत, अजून निर्णय व्हायचा असल्याचे सांगत असल्याचे होते. त्यामुळे शिंदे गट फुटल्याच्या चर्चेला तोंड फुटले. याबाबत पालकमंत्री शिरसाट यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

भाजपवर दबाव...
बहूमताच्या जवळ पोहोचलेल्या भाजपवर विरोधी पक्षांनी चांगलाच दबाव आणला होता. एमआयएमने शिवसेना शिंदे गटाला पाठिंब्याची ऑफर दिली. एमआयएम, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट तसेच कॉग्रेस, राष्ट्रवादी-वंचित यांची मोट बांधण्याचे मनसुबे विरोधकांनी जाहीर केले होते. राष्ट्रवादीच्या सतविंदर ओबेरॉय यांनी महापौर-उपमहापौर पदासाठी अर्ज नेल्यानेही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभुमीवर भाजपला तातडीने निर्णय घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

पालकमंत्री माध्यमांना भेटलेच नाही..
दरम्यान, पारकर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भाजपने महापौर पदासाठी समीर राजूरकर तर उपमहापौर पदी राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर तशा बातम्याही सोशल मिडीयावर फिरू लागल्या. मात्र पालकमंत्री संजय शिरसाट माध्यमांसमोर आलेच नाहीत. तर त्यांचे समर्थक माजी महापौर नंदकुमार घोडेलेंनी तीन नावे उपमहापौरांच्या शर्यतीत असल्याचे सांगत असा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतलाच नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेना शिंदे गट दुभंगला अशी चर्चा सुरू झाली.

सकाळपासूनच मोठ्या हालचाली...

भाजपने काल गटनेत्याची निवड केल्यानंतर महापौर पदाच्या उमेदवाराचे नावही कालच जाहीर होईल असे मानले जात होते. मात्र शिवसेनेला सोबत घ्यायचे की नाही यावर निर्णय होत नव्हता. याबाबत भाजपमध्येच दोन मतप्रवाह पडले होते. आज सकाळी भाजपचे मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांची तातडीची बैठक झाली. त्यात वरिष्ठांच्या आदेशाने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास शहराध्यक्ष शितोळे शिरसाट यांच्याकडे चर्चेसाठी निघाले. मात्र शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक विलास पारकर चर्चेसाठी शितोळेंच्या घरी येत असल्याचा निरोप आला. त्यानंतर भाजप नेत्यांची पारकर यांच्यासोबत बैठक झाली.