भाजप हा मराठी माणसाचा पक्ष नाही, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार

Foto
 मुंबई : आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सन्मानाने आघाडी केलेली आहे. १४० च्या आसपास जागा आम्ही लढत आहोत. राज ठाकरे यांचा पक्ष मोठ्या प्रमाणावर जागा लढत आहे. शिवसेना म्हणून मिरवणारे हे लोक भारतीय जनता पक्षाने फेकलेल्या जागांवर लढत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय. तर भाजपा हा मराठी माणसाचा पक्ष नाही. भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा काडीमात्र संबंध नाही, असा घणाघात देखील त्यांनी केलाय. 
 
संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देत होती. आता काय पाळी आली आहे. स्वतःला अमित शाहांची शिवसेना म्हणवून घेणार्‍यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभे राहावं लागत आहे. त्यांनी फेकलेल्या जागांवर निवडणूक लढवावी लागत आहे. ही त्यांची शिवसेना आहे. यापूर्वी मुंबईत साठ वर्षांच्या इतिहासात शिवसेना कधी कुणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही. पण एकनाथ शिंदे यांचा गट युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शाहांच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षांनी त्यांना जागा दिलेल्या आहेत. हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाणी आहे, अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. 

भाजपने फेकलेल्या जागांवर शिंदेंची शिवसेना निवडणूक लढतेय

संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सन्मानाने आघाडी केलेली आहे. १४० च्या आसपास जागा आम्ही लढत आहोत. राज ठाकरे यांचा पक्ष मोठ्या प्रमाणावर जागा लढत आहे. राष्ट्रवादीला आम्ही जागा देत आहोत. मला वाईट वाटलं की, शिवसेना म्हणून मिरवणारे हे लोक भारतीय जनता पक्षाने फेकलेल्या जागांवर लढत आहेत. जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती. शिवसेनेच्या मर्जीने युती होत होती. तेथे एकनाथ शिंदे यांच्यासारखे लोक लाचार मराठी माणसाचे दर्शन घडवत आहेत, हे मराठी माणसाचे दुर्दैव आहे, असे देखील त्यांनी म्हटले. 

भाजप हा मराठी माणसाचा पक्ष नाही

२०१७ साली भाजपची जी भूमिका होती, ती झुगारून आम्ही स्वतंत्रपणे लढलो होतो. याला स्वाभिमान म्हणतात. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या, तेव्हा शिवसेना स्वाभिमानाने बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढली होती. पण लाचारी पत्करली नाही. जेव्हा दिलेला शब्द भाजपने पाहिला नाही आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो आणि आम्ही आमचे राजकारण केले. आम्ही दिल्लीला शाह आणि मोदींच्या दारात जाऊन बसलो नाही, गवतावर बसून सफेद पेंटवर गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही. आम्ही ताकदीने लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवला. आता त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणवून घेणे बंद केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेनाच खरी आहे. भाजपा हा मराठी माणसाचा पक्ष नाही. भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा काडीमात्र संबंध नाही, असा घणाघात देखील संजय राऊत यांनी केलाय.