भाजप-सेना युतीचा गोंधळात गोंधळ तर महाविकास आघाडीत शांतता...एबी फॉर्मशिवाय अर्ज दाखल करण्याची तयारी

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः रात्रंदिवस बैठकांचे सत्र सुरू असले तरी भारतीय जनता पार्टी आणी शिवसेना शिंदे गटात युतीचा निर्णय होऊ शकला नाही. महत्वाच्या ८ ते १० जागांवर घोडे अडले असल्याचे बोलले जाते. रात्री उशीरापर्यंत खलबते होऊनही बैठक वांझोटी ठरली. परिणामी दोन्ही पक्षामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे २४ तास उरले असताना दोन्ही पक्ष हो-नाही, नाही हो च्या चक्रात अडकले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीतील शिवसेना उद्वव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यात मात्र काही चर्चा चालू आहे की, नाही हे कळायला मार्ग नसल्याने इच्छूक उमेदवार चिंतीत झाले आहेत.  

महापालिकेत भाजप-सेना युती होणार की नाही याचा निर्णय मुंबईहून होणार असे दोन्ही पक्षांचे नेते कालपर्यंत सांगत होते. हिंदूबहूल पट्ट्यातील ८८ जागांवर दोन्ही पक्षांची मदार आहे. यात भाजपने मोठा भाऊ असल्याचे सांगत किमान ५० ते ५५ जागा मागितल्या. आणि शिंदे गटाला ३७ जागा देऊ केल्या. अखेरपर्यंत भाजप नेत्यांनी ताणून धरल्याने शिवसेनेची गोची झाली. तर शिंदे गटानेही माघार घेतली नाही. अखेर स्थानिक पातळीवर हा निर्णय होणार नसल्याचे सांगत दोन्ही पक्षनेत्यांनी चेंडू मुंबईकडे वळविला. सुत्रांच्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी स्थानिक नेत्यांना समजावत दोन पावले मागे येण्याची सुचना केली. त्यानंतर पुन्हा झालेल्या बोलणीतही निर्णय झाला नाही. अखेर काल रात्री दोन्ही पक्षांनी पुन्हा वरिष्ठांशी चर्चा केली.

शहरात मिरवणूका अन शक्तीप्रदर्शन

राजकीय पक्षांचे भिजत घोंगडे असताना शहरात मात्र इच्छुकांचे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. आज सकाळपासूनच काही उमेदवारांनी रॅली काढल्या. तर अनेक अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल करणे सुरू केले आहे. दुसरीकडे भाजप-शिंदे गटाच्या नाराजांना खेचण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि कॉग्रेस बाशिंग बांधून आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनीही उमेदवार अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहेत.

एबी फॉर्मशिवाय अर्ज...

दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार भाजपने इच्छुक ९० टक्के उमेदवार फायनल केले आहेत. या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी सज्ज राहावे असे सांगण्यात आले आहे. शिवसेनेनेही उमेदवार जवळपास फायनल केले आहेत. युतीचा निर्णय काहीही आला तरी दोन्ही पक्षांनी उमेदवारांची सज्जता केली आहे. माहितीनुसार एबी फॉर्मशिवाय दोन्ही पक्षांचे अर्ज दाखल होऊ शकतात. नंतर अर्जाला एबी फॉर्म जोडता येईल, अशी खेळी करण्यात येणार आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेना आज दुपारी युतीचा निर्णय जाहीर करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

युतीची चर्चा सकारात्मक झाली आहे. काही जागांवर तिढा असला तरी बहूतांश जागी सहमती झाली आहे. याबाबतचा निर्णय दुपारपर्यंत होणे अपेक्षित आहे. युतीसाठी आमचा अखेरपर्यंत प्रयत्न राहणार आहे.
- संजय शिरसाट, पालकमंत्री

गेले दोन दिवस चर्चा अधिक चांगली झाली. आता लवकरच युतीबाबत निर्णय होणार आहे. महापालिकेत युतीचा झेंडा फडकविण्यासाठी आम्ही नक्कीच एकत्र येऊ.
- आ. संजय केणेकर, भाजप