ठाणे : काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांकडून देशात लोकशाही संपवून अराजकता निर्माण करण्याचे षडयंत्र सुरू आहे, असा आरोप करत काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांची लढाई भाजप, एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर नसून ती भारत आणि भारतीय संविधानाबरोबर असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ठाण्यात केला. व्होट चोरीचा आरोप करणारा काँग्रेस पक्ष हाच संविधान चोरणारा पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली.
ठाण्यात भाजपच्या वतीने रविवारी लोकतंत्र बचाव पदयात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, प्रताप सरनाईक, जयकुमार रावल यांच्यासह महायुतीचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना विरोधकांवर टीका केली. १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाला निष्प्रभ करण्यासाठी काँग्रेस सरकारने संविधानात पूर्वलक्षी प्रभावाने बदल केले. पंतप्रधानांच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली. त्यानंतर १९७६ मध्ये आणखी घटनादुरुस्ती करून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणण्यात आल्या. संविधानाची मोडतोड करून न्यायव्यवस्था आणि लोकशाही कमकुवत करण्याचे काम काँग्रेसने केले, असा आरोप त्यांनी केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत अधिकार दिले. या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना थेट सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात दाद मागता यावी, अशी व्यवस्था केली. मात्र, काँग्रेस सरकारने आणीबाणीच्या काळात या अधिकारांवर गदा आणली. १९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर घटनादुरुस्ती करून नागरिकांचे अधिकार पुन्हा बहाल करण्यात आले, असेही फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेसकडून वारंवार निवडणूक आयोग, संसद, भारतीय रिझर्व्ह बँक, नियंत्रक व महालेखापरीक्षक यांसारख्या घटनात्मक संस्थांवर टीका केली जात आहे. आता सर्वोच्च न्यायालयालाही लक्ष्य केले जात आहे. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधान वाचवण्याची भाषा करणार्यांनी सर्वोच्च न्यायालयाविरोधातील आंदोलनाबाबत मौन का बाळगले, असा सवालही त्यांनी केला.
चीनकडून काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या ट्रस्टला देणग्या का मिळत आहेत आणि चीनच्या पैशावर भारतात अराजकता निर्माण करण्यासाठी तुम्ही का उतरला आहात, असा माझा राहुल गांधींना सवाल आहे. एक नवीन लाल पुस्तक आले आहे. हे जे लाल संविधान दाखवतात ना, हे लाल संविधान म्हणजे केवळ त्यांचा मुखवटा आहे. त्यांचे खरे इरादे या लाल पुस्तकात आहेत. या लाल पुस्तकाचा वापर करून या षडयंत्रकारांनी नेपाळचे संविधान बदलले, श्रीलंकेचे संविधान बदलले, बांगलादेशचे संविधान बदलले आणि आता तेच लाल पुस्तक घेऊन ते भारतात उतरले आहेत. एका हातामध्ये लाल संविधान ठेवा आणि दुसरीकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने तयार केलेली एकेक संस्था बदनाम करा, अशी यांची निती आहे, अशी टिकाही फडणवीस यांनी केली.