जेईई मेन परीक्षेला आजपासून सुरुवात, देशातील पंधरा शहरात एकाचवेळी परीक्षा

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): देशातील सर्वात महत्त्वाच्या आणि स्पर्धात्मक अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या जेईई मेन परीक्षेला आजपासून सुरळीत सुरुवात झाली आहे. एनटीए तर्फे घेण्यात येत असलेल्या जेईई मेन परीक्षा शहरातील चार परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येत आहे. आज सकाळी ७ वाजताच केंद्रावर परीक्षा विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

शहरासह देशभरातील पंधरा शहरात एकाचवेळी जेईई मेन परीक्षा घेण्यात आली. शहरातील चार परीक्षा केंद्रावर परीक्षेला सुरुवात झाली. यात सीएसएमएसएस कॉलेज, इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, बाईकटेक्ज इन्फोटेक्क्स, आयऑन झोन ऑफ चिकलठाणा या केंद्रावर परीक्षेला सुरुवात झाली. एकूण १६ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले आहेत. ही परीक्षा २९ तारखेपर्यत चालणार असून दररोज दोन सत्रात घेतली जाणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते १२, तर दुसरे सत्र दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. परीक्षेच्या आधीच सर्व विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग टाइमनुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना नियमांचे पालन करून परीक्षेला हजेरी लावली.

सकाळी सातलाच विद्यार्थी केंद्रावर होते हजर

परीक्षा केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थी हजर राहिले. सकाळी ७.३० ते ८.३० यावेळेत विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करून परीक्षा केंद्रात प्रवेश केला. परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्यात आली. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी एनटीए तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने विशेष तयारी केली. सकाळी ९ ते १२ यावेळेत पहिला पेपर झाला.