छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) अदालत रोड येथील मधुबन केंद्राच्या वतीने आजपासून तीन दिवसीय श्रीमद् भागवतकथा उत्सवाला प्रारंभ होत आहे. हा कथा उत्सव इस्कॉनचे भगवद्गीता प्रचारक सार्वभौम प्रभुजी यांच्या अमृतमय वाणीने संपन्न होणार आहे.
यानिमित्ताने मधुबन कथा सभागृहाची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. श्रोत्यांच्या बसण्याची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र महाप्रसाद व्यवस्था तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर व आरक्षित खुर्च्यांची विशेष सोय करण्यात आली आहे. सार्वभौम प्रभुजी ९ ते ११ जानेवारी या कालावधीत आपल्या सुमधुर वाणीने श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करणार आहेत. आज दि.९ जानेवारी व शनिवारी (दि. १०) सायंकाळी ६ वाजता कथेला सुरुवात होईल. तर रविवार, दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता तसेच सायंकाळी ६ वाजता कथा श्रवणाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. प्रत्येक कथा सत्रानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांच्या वतीने सर्व भाविकांनी या तीन दिवसीय कथा उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी इस्कॉन मधुबन केंद्र प्रमुख डॉ. रमेश लड्ढा, विनोद बगडिया, माधव मुंडे, रेखा खैरनार, रचना मद्रेवार, कल्पना बगडिया, मोनिका ठाकूर आदी परिश्रम घेत आहेत.














