टोकियो : मध्य पूर्वेत मागील 15 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या दरम्यान, आता उत्तर कोरिया देखील युद्धाची तयारी करत असल्याचे दिसून येते. शनिवारी, उत्तर कोरियाने त्याच्या पूर्व किनाऱ्यावरून समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली. एकीकडे इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले असताना आता युद्धासाठी कधीही एका पायावर तयार असणारे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने युद्धाचा सराव सुरु केला आहे. उत्तर कोरियाच्या लष्कराने शनिवारी पूर्व समुद्रकिनाऱ्यावरुन 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. ही केवळ क्षेपणास्त्रांची चाचणी असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरिया आणि जपानने 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दक्षिण कोरियाकडूनही उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आल्याच्या वृत्ताबाबत भाष्य करण्यात आले आहे. उत्तर कोरियाने पूर्वे समुद्रकिनाऱ्यावरुन अज्ञात वस्तू प्रक्षेपित ( संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी) केल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. जपान या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने सोडलेली क्षेपणास्त्रे समुद्रात पडल्याची माहिती जपानकडून देण्यात आली आहे. सध्या दक्षिण कोरियन लष्कराच्या वार्षिक सैन्य कवायती (फ्रीडम शिल्ड) सुरु आहेत. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात असलेल्या पूर्वापार संघर्षामुळे उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाच्या या वार्षिक सैन्य कवायतींना विरोध केला जातो. उत्तर कोरियाने शनिवारी अचानक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्रचंड मोठी लष्करी ताकद, आधुनिक युद्धसामुग्री आणि अणवस्त्रधारी असलेला उत्तर कोरिया या सगळ्या संघर्षात उतरल्यास हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील सर्व देश उत्तर कोरियाच्या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षाचा आजचा 15 वा दिवस आहे. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. खनिज तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत. दरम्यान, इराण युद्धात माघार घेत नसल्याने आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी सुरु केली आहे. अमेरिकेचे 2500 मरिन कमांडो आणि एक एम्फिबियस असॉल्ट शिप पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अमेरिका इराणमध्ये एखादी मोठी लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाने अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. अमेरिकेने उचललेले युद्धाचे पाऊल बेशरमपणाचे असल्याची भूमिका उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली होती.
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की त्यांना दुपारी 1:20 वाजता उत्तर कोरियाच्या सुनान भागातून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र आढळले. या वर्षी उत्तर कोरियाने सोडलेले हे तिसरे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र होते.
दक्षिण कोरिया सतर्क
जेसीएसने म्हटले आहे की, आमचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे आणि उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांशी संबंधित माहिती अमेरिका आणि जपानसोबत शेअर करत आहे. आम्ही कोणत्याही अतिरिक्त क्षेपणास्त्रांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
जपान सरकारही सतर्क
जपान सरकार या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने डागलेली वस्तू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असू शकते. उत्तर कोरियाने डागलेली संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आधीच समुद्रात पडली आहेत, जपानी तटरक्षक दलाने सांगितले आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिका त्यांचा वार्षिक वसंत ऋतूतील लष्करी सराव फ्रीडम शील्ड आयोजित करत आहेत. या दरम्यान उत्तर कोरियाने ही चाचणी केली आहे.
उत्तर कोरिया अनेकदा या लष्करी सरावांना विरोध करत आला आहे. त्यांना युद्धाची तयारी मानत आला आहे. त्यामुळे, अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सरावांना प्रत्युत्तर म्हणून क्षेपणास्त्र प्रक्षेपण हे त्यांचे लष्करी सामर्थ्य दाखविण्याचा प्रयत्न असू शकतो.