कोहिनूर कॉलेजच्या २३५२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

Foto
 खुलताबाद, (प्रतिनिधी) _: संस्थेची मालमत्ता गहाण ठेवून नूतनीकरणाच्या कामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने चोला मंडलम् या खासगी वित्तीय संस्थेने कोहिनूर महाविद्यालयाच्या तीनमजली इमारतीला सील ठोकले. संस्थेकडे २ कोटी ८२ लाख ८६ हजार २५४ रुपयांचे कर्ज थकीत असल्याने कारवाई झाली.

खासगी वित्तीय संस्थेचे विधी सल्लागार अॅड. सागर लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुलताबाद तालुक्यातील बादलाबाई, शूलिभंजन गट नं. २१ मध्ये कोहिनूर शिक्षण संस्थेची तीनमजली इमारत आहे. या इमारतीच्या नूतनीकरणासाठी २९ सप्टेंबर २०२२ रोजी कोहिनूर शिक्षण संस्था व संस्थेचे अध्यक्ष मजहर खान, सचिव आस्मा मजहर खान यांनी २ कोटी ९४ लाख २० हजार ३९९ रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जातर्गत २ कोटी ८२ लाख ८६ हजार २५४ रुपये संस्थेकडे बाकी आहेत. या कर्जाची परतफेड करण्यासाठी ४ लाख २२ हजार ९७ रुपये हप्ता होता. याची परतफेड १२० महिन्यांत करण्याचे निश्चित करण्यात आले होते, मात्र कर्जाचे हप्ते थकल्याने वित्तीय संस्थेने जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने इमारत जप्त करण्याचे आदेश पारित केले.

प्रांगणात शिकवणार : 
याबाबत प्राचार्या शेख कमरुन्निसा बेगम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिक्षण सहसंचालक, धर्मादाय आयुक्तांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरज भासल्यास महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्याथ्यर्थ्यांना शिक्षण दिले जाईल. तसेच दैनंदिन काम खुल्या प्रांगणात सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज विद्यापीठात बैठक : 

करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बैठक या प्रकरणावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासह अन्य उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

थकीत रक्कम एका महिन्यात न भरल्यास मालमत्तेचा होणार लिलाव : 

कारवाईपूर्वी पथकाने महाविद्यालयाच्या प्राचार्या कमरुन्निसा बेगम यांची भेट घेऊन इमारतीमधील वस्तू बाहेर काढून घेण्यास सांगितले. त्या वस्तू आता महाविद्यालयात अडकल्या, पथकाने खोल्यांना कुलूप लावून प्रवेशद्वाराला सील ठोकले. थकीत रक्कम पुढील एका महिन्यात न भरल्यास या स्थावर मालमत्तेचा लिलाव होणार असल्याची माहिती अॅड. लाड यांनी दिली.

विद्यार्थी, पालकांमध्ये चिंता : 

या महाविद्यालयात अकरावी ते पदव्युत्तर वर्गाचे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे विद्यार्थी शिकतात. अकरावीत ३२३, बारावीत ४१८, प्रथम वर्ष ४६३, द्वितीय वर्ष ५४६, तृतीय वर्ष ३७०, पदव्युत्तर २३२ असे एकूण २३५२ विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयात प्राचार्यांसह ७२ प्राध्यापक व इतर कर्मचारी कार्यरत आहेत. या महाविद्यालयाला सील लावल्यामुळे विद्याथ्यर्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. कॉलेजच्या २३५२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.