आक्रमक भाजपा आणि अस्वस्थ शिवसेनेमुळेच एमआयएम फोफावली; मुख्यमंत्र्यांच्या जवळचे सावे शहराचे महत्त्वाचे प्रश्न सोडवतील का ?

Foto


  औरंगाबाद: शिवसेना-भाजपातील सत्तासंघर्षाचे अखेरचे टोक म्हणजेच एमआयएमचा उदय यात दुमत असण्याचे कारण नाही. जालना -औरंगाबाद या दोन जुळ्या जिल्ह्यामध्ये भाजपाने  प्रचंड प्रभाव निर्माण केला आहे. एक केंद्रीय राज्यमंत्रीपद,  विधानसभा अध्यक्षपद आणि आता दोन राज्यमंत्री पदे भाजपाच्या खात्यात जमा झाली आहेत. तुलनेने शिवसेनेकडे केवळ एकच राज्यमंत्रीपद आहे. भाजपचा वाढलेला प्रभाव  सेनेला मुळीच खपणार नाही. अस्वस्थ शिवसेना आणि आक्रमक भाजपा यांच्यातील हा संघर्ष विधानसभेपर्यंत कायम राहिला तर औरंगाबाद विधानसभेतील तीन जागा एमआयएमच्या खात्यात जाऊ शकतात यात शंका नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळल्यानंतर सेनेने वजाबाकीचे तर भाजपाने बेरजेचे राजकारण केल्याचे दिसते. खैरे पराभूत झाल्यानंतर सेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पक्षांतर्गत कठोर निर्णय घेऊन बूथ पातळी पर्यंत फेरबदल अपेक्षित असताना सेनेत असे काहीही घडून आले नाही. दुसरीकडे खैरेंच्या पराभवाचे खापर सेनेवरच फोडून भाजपने आक्रमकता दाखवून दिली. एमआयएम हा भाजप आणि सेनेचा समान शत्रू ! या शत्रूला नामोहरण करण्यात वरचढ कोण ठरते, हे दाखविण्याची अहमिका या दोन पक्षात लागली आहे. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. या मित्रपक्षातील चढाओढीमुळेमुळेच एमआयएमला बळ मिळते यात शंका नाही. गेल्या विधानसभेच्या वेळी जे घडले त्याची तंतोतंत कॉफी लोकसभा निवडणुकीत झाली. नवख्या एमआयएम पक्षाने केलेले केलेला अभ्यास, मांडलेली राजकीय गणिते शंभर टक्के खरी ठरली. मतदानानंतर जलील यांनी मी चार लाख मते घेणार असे जाहीर केले होते. त्यानुसार घडलेही तसेच. हिंदू मतांमध्ये फूट पाडून विजयी होण्याची एमआयएम ची खेळी यशस्वी ठरली. सेना -भाजपाने विधानसभेच्या पराभवापासून कोणताही धडा घेतला नाही. परिणामी लोकसभेत पराभव झाला. परवा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेला गोंधळ एमआयएमची एकी तर भाजप-सेनेची बेकी दर्शवणारा होता. काही दिवसांपूर्वी खैरे यांनी पूर्व मतदारसंघ शिवसेना जिंकू शकते असे वक्तव्य केले होते. तेव्हाच भाजपाच्या मतदार संघावर सेनेचा डोळा असल्याचे दिसून आले. आता भाजपने सावेना मंत्रिपद दिले आहे.-शिवसेना पूर्व मतदार संघावर निशाणा साधून असताना भाजपने मंत्रिपदाची खेळी खेळली. याचा अर्थ शहरातील भाजपची सूत्रे अतुल सावे कडे जाणार यात शंका नाही.

 शहरवासीयांना दिलासा देणार का? 
 जुने आणि नवे शहर असे शहराचे दोन भाग आहेत. जुन्या शहरात सेनेला मानणारे तर नव्या शहरातील मतदारांचा झुकाव भाजपकडे दिसून येतो. अशावेळी कचरा, पाणीप्रश्न, रस्ते, वीज अशा महत्त्वाच्या प्रश्नांनी त्रस्त शहरवासीयांना आता सावेंकडून अपेक्षा आहे. विशेषता शहराच्या पाणी आणि कचरा प्रश्नावर सावे तातडीने तोडगा काढतील अशी आशाही  शहरवासीयांना आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार महिनेच हातात आहेत. त्यातही दीड महिना आचारसंहितेत जाईल म्हणजेच अवघ्या दोन महिन्यांचा वेळ सावेंना यांना मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या संबंधाचा फायदा घेत शहराचे प्रश्न सोडविण्यास त्यांना कितपत यश येते त्यावर विधानसभेचे गणित अवलंबून आहे.

  एमआयएम आक्रमक 
लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर एमआयएम काहीशी आक्रमक मूडमध्ये दिसून येते. शिवसेनेसह काँग्रेसलाही अंगावर घेण्याची भाषा जलील बोलत आहेत. खरेतर सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भाषा करणाऱ्या जलील यांनी फ्रंट फुटवर खेळण्याचे धोरण अवलंबल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सेना भाजपातील बेकिंचा फायदा घेत शहरातील तीनही मतदारसंघ काबीज करण्यासाठी एमआयएमने कंबर कसली आहे.