पैठण : वाहेगाव येथे तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणार्या भाजपच्या विद्यार्थी मोर्चाच्या पैठण तालुका उपाध्यक्षाविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तलवारीसह आरोपीला गजाआड करण्यात आले आहे. भाजपच्या विद्यार्थी मोर्चाचा तालुका उपाध्यक्ष करण बोडखे याने आपल्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याचे समोर आले होते.
विशेष म्हणजे, बोडखे याने हातात तलवार घेऊन फोटोसेशन करून हा फोटो फेसबुकवरून व्हायरल केला होता. याबाबत पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी गंभीर दखल घेत आरोपी करण बोडखे यास अटक करून त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शस्त्रबंदी कायदा लागू असताना करण बोडखे याने आपल्या वाढदिवसाला हातात तलवार घेऊन केप कापला होता. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या वाढदिवसाच्या कार्यक्रमास भाजप युवा मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष तथा नगरसेवक दत्ता गोर्डे, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे, माजी नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. करण बोडखे याने तलवारीने केक कापल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी करणला अटक केली असली तरीही, भाजपकडून त्या पदाधिकार्यावर अजून कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजप गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.