औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून नळाला दूषित पाणी येत असल्याने पुंडलिक नगर, हनुमान नगर परिसरातील नागरिक त्रस्त होते. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही नगरसेविका मीना गायके यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आज शुक्रवारी अधिकारी संबंधित ठिकाणी जाऊन केवळ ड्रेनेज दुरुस्तीचे काम करीत असल्याने मोठ्या प्रमाणावर जमलेल्या नागरिकांनी महानगर पालिकेच्या अधिकार्यांना घेराव टाकला.
गुरुवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत समान पाणीपुरवठा व दूषित पाण्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यावेळी पुंडलिक नगर च्या नगरसेविका मीना गायके यांनी आपल्या वॉर्डातील नागरिक दूषित पाण्याचा पुरवठ्याने त्रस्त असून, त्यांनी दूषित पाण्याच्या बाटल्या आयुक्तांसमोर ठेवल्या होत्या. तसेच नागरिक या प्रश्नावरून संतापलेले आहेत. वार्डात अधिकारी आल्यास त्यांच्यासोबत काही अप्रिय घटना घडल्यास आपण जबाबदार राहणार नाही असे सांगितले होते. यानंतर आज शुक्रवारी सकाळी पाणी पुरवठा विभागाचे के.एम.फालक, शाखा अभियंता दिलीप क्षीरसागर, लाईनमन सचिन कोळेकर, सचिन परदेशी, कार्यकारी अभियंता पी.जी. पवार यांच्यासह अधिकारीदेखील दाखल झाले. ड्रेनेज दुरुस्तीचे काम होत असल्याने मोठ्या प्रमाणावर जमलेल्या नागरिकांनी अधिकार्यांना घेराव टाकला. केवळ पाहणी करून थातूर-मातूर कामे करून जाऊ नका आमच्या घरातील अनेक दूषित पाण्यामुळे सदस्य आजारी आहे. यामुळे अधिकारी अक्षरशः हतबल झाले होते. प्रसंगी नगरसेवक आत्माराम पवार, मीना गायके, यांच्यासह कविता बोडखे, अरुणा देशमुख, रेखा चौधरी, सुभद्रा हिवराळे, सरला सोनवणे, अनिता खैरनार, जयश्री पगारे, मीना यादव, पूजा साळवे, सुलोचना कुमावत, सुभद्रा कुमावत, रुक्मिणी द्वारके, आदींची उपस्थिती होती.
वरिष्ठांना फोन करा अन्यथा तुम्हाला येथेच बांधतो...
आक्रमक झालेले नागरिक व नगरसेवक पुत्र विशाल गायके यांनी अधिकार्यांना तुम्ही वरिष्ठांना व आयुक्तांना फोन करा अन्यथा दोरीच्या साह्याने तुम्हाला इथेच बांधून ठेवू असा इशारा दिला. यानंतरही अधिकार्यांनी त्यांना फोन केला नाही. त्यानंतर विशाल यांनी आयुक्तांना फोन केला. व आपण स्वतः पाहणी करता यावे अशी मागणी आयुक्तांकडे केली. त्यावर आयुक्तांनी आज येणे शक्य नसल्याचे सांगितले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले हेदेखील हनुमान नगर गल्ली क्रमांक एक मध्ये दाखल झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे गाडीतून खाली उतरून त्यांनी पाहणी केली आणि लगेच माघारी फिरले. यामुळे परिसरात जमलेले नागरिक विशेषतः महिला चांगल्याच संतापल्या महापौरांना आमचे प्रश्न आमच्या समस्या ऐकायचा नव्हत्या तर महापौर या ठिकाणी आलेच कशाला असा संतप्त सवाल त्यांनी व्यक्त केला.