औरंगाबाद- भव्य आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा, देशातील सर्वात मोठा क्रीडा, कला महोत्सव, क्रिकेटची पंढरी असलेले झालानी मैदान, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले क्रिकेट प्रेमी, आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना लाजवेल असा हा क्रिकेटचा सामना आणि त्याचे संघप्रमुख अशी मोठी मोठी बिरुदावली वापरून भाजपने सीएम चषकाचा बडेजाव जिल्हाभरात सुरू केला आहे. गेल्या बारा दिवसांपासून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत पूर्व मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांच्या वतीने आयोजित क्रिकेट सामन्यांचा महाअंतिम सोहळा कोणतीही लाईट, तसेच दिव्यांची सुविधा नसतांना अंधारात रंगला हे विशेष.
या स्पर्धेला खेळाडू आणि आयोजक एवढीच संख्या असतांना मात्र आयोजकांच्या वतीने झालानी मैदान भरगच्च भरल्याचे सांगितल्या जात होते. मात्र प्रत्यक्षात बोटावर मोजण्या इतकीही संख्या मैदानावर नव्हती. वीस हजार युवक युवती या महोत्सवाला जोडल्याचे आयोजक आमदार अतुल सावे यांनी आपल्या भाषणातून सांगितले मात्र सामने पाहण्यासाठी मैदानाकडे प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरवली.
देशातला सर्वात मोठा क्रीडा महोत्सव म्हणवून घेणाऱ्या या क्रिकेट सामन्यात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी क्रिकेट कॉमेंट्री करत भाजपातीलच पुढाऱ्यांचे वाभाडे काढले. यामध्ये समृद्धी महामार्गातील मिळालेला मोबदला, विकास कामांचे मिळालेले टेंडर, महानगर पालिका वॉर्ड अंतर्गत असलेली कामे सांगत षटकार, चौकारावर गोलंदाज आणि फलंदाजांना रोख पारितोषिके नावापुरते फुशारकीने जाहीर केले. विशेष म्हणजे आमदार अतुल सावे, आमदार संतोष रावसाहेब दानवे यांच्यासमोर आणखीच अंगात आणून सदरील आयोजक कार्यकर्त्यांची क्रिकेट खेळाचे कोणतेही गांभीर्य न दाखवता हुल्लडबाजी सुरू होती.
झालानी मैदानावर कोणतीही प्रकाशयोजना नसल्याने आजचा क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना गुंडाळत आयोजकांनी बक्षीस वितरणाची लगीनघाई केली. यावेळी माजी उपमहापौर राजू शिंदे, नगरसेवक शिवाजी दांडगे, दिलीप थोरात, माजी नगरसेवक अनिल मकरिये, दामूअण्णा शिंदे, हुशरसिंग चव्हाण, गणेश नावंदर, जालिंदर शेंडगे, प्रशांत देसरडा, श्रीनिवास कुलकर्णी, नितीन बगडीया, मनीषा भन्साली, यांच्या उपस्थितीत अंधारातच बक्षीस वितरण उरकले हे विशेष.

















