महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, आदित्य ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?

Foto
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची  धुरा दिली जाणार आहे. आदित्य ठाकरे यांना पक्षाकडून १९ जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेतील आदित्य ठाकरे यांचे महत्त्व वाढणार असून त्यांच्याकडे  मोठ्याप्रमाणावर अधिकार येतील, असे सांगितले जात आहे. 

२००३ साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती, अगदी तशाचप्रकारे आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. यासाठी शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलवून तसा रितसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतो. 

गेल्या काही वर्षांपासून आदित्य ठाकरे हे संघटनात्मक निर्णय ते निवडणुकांपर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडत आहेत. त्यामुळे आता त्यांना मोठी जबाबदारी दिली पाहिजे, असा एक मतप्रवाह शिवसेनेच्या काही नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे पक्षाला नवी उभारी मिळू शकते. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत नवी फळी बांधली जाईल, असा एक मतप्रवाह आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा सुरु असून उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी धुरा देऊन ते राजकारणात एक पाऊल आणखी पुढे जातील, असा प्रयत्न आहे. त्यासाठीचा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध गोष्टींची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, उद्धवसेनेसंदर्भात एक बातमी आली आहे. जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खासदार संजय राऊत यांनीही याबाबत पत्रकार परिषदेत उत्तर दिल्याने ही चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. पण आता या विषयावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे.

आदित्य ठाकरे हे उद्धवसेनेचे वरच्या फळीतील नेते आहेत. उद्धव ठाकरे यांचा आमदार म्हणून विधान परिषदेतील कार्यकाळ नुकताच संपला. आता पुन्हा उद्धव ठाकरे आमदारकी लढवणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण याच दरम्यान महाराष्ट्रात राजकारणात उद्धवसेनेत नेतृत्वबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरे यांना पक्षाचे कार्याध्यक्षपद दिले जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. पण आदित्य ठाकरे यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. "आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी," अशी एक्स पोस्ट करत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
 
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. जर आदित्य ठाकरे यांचे नाव आपल्या माध्यमातून समोर आले असेल त्याचे स्वागत केले पाहिजे. नक्कीच आता, तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढलं राजकारण तरुणांच्या हातात गेले पाहिजे. आदित्य ठाकरेंबद्दल खासगीत नेते काय बोलता, याला अर्थ नसतो. मुंबई महानगरापलिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी आणि त्यांच्या टीमने उत्तम काम केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.