कृषी राज्यमंत्र्यांच्या स्टिंग ऑपरेशन नंतरही जिल्ह्यात युरीयाचा काळाबाजार सुरूच

Foto
कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी जून महिन्यात स्टिंग ऑपरेशन करून युरिया खताचा साठा दाबून ठेवणार्‍या वितरकांवर कारवाई केली होती. पण गेल्या महिन्याभरापासून व्यापार्‍यांनी युरिया खताचा काळाबाजार सुरू केला आहे. 266 रुपयाला मिळणारी खताची बॅग 300 रुपयाला विकली जात आहे. या सर्व प्रकाराकडे कृषी विभागातील अधिकारी, भरारी पथकातील मंडळी सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.
यावर्षी पाऊस समाधानकारक पडत आहे.त्यामुळे शंभर टक्क्यांवर पेरणी करण्यात आली आहे.सुरुवातीला युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या होत्या. त्यामुळे कृषी राज्यमंत्री दादा भुसे हे औरंगाबादली आढावा  बैठकीसाठी आले होते. त्यावेळी जाधवाडी मंडीतील एका कृषी केंद्रावर ते साधे शेतकरी बनून गेले. त्यांनी दुकानदाराकडे खताची मागणी केली. युरिया नसल्याचे व्यापार्‍याने त्यांना सांगितले. मात्र दुकानात साठा असल्याचे फलकावर होते. ही बाब निदर्शनास आणून दिली.त्यावेळी मंत्र्यांनी अधिकार्‍यांना बोलावून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्ह्यातील खताचा काळाबाजार थांबेल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही जिल्हापातळीवर कृषी विभागाने तालुकानिहाय भरारी पथकाची स्थापना केली. तरी सुद्धा जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार सुरूच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची खतासाठी धावपळ सुरू आहे. पाऊस समाधानकारक पडत आहे. त्यामुळे कपाशी, मका, सोयाबीन, बाजरी ,तीळ, मूग, उडीद ,तूर, चवळी यांसह अन्य पिके चांगली आहेत. त्या पिकांना आता बहर येत आहे. त्यामुळे खताची आवश्यकता आहे पण ते मिळत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. काळाबाजार करणार्‍यांवर कार्यवाही करून शेतकर्‍यांना खते मिळवून द्यावेत अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे