माजी सरपंच राजेंद्र वाघ यांच्या प्रयत्नांना अखेर मिळाले यश
फुलंब्री, (प्रतिनिधी) : फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव बु ते उमरावती या रस्त्याला काही शेतकऱ्याकडून बोधेगाव बु. शिवारातील गट नं. ३९४ मध्ये अडविण्यात आल्याने रस्त्याच्या कामात व्यत्यय झाला होता. अखेर सोमवारी (दि. ८) रोजी पोलीस बंदोबस्तात अडविलेला रस्ता मोकळा करून पूर्ण करण्यात आला.
यापूर्वी संबंधित बांधकाम विभागाला रस्त्या विषयी कळविण्यात आल्यावरही ते एक दुसऱ्याचे नाव सांगून पळ काढत असल्यामुळे बोधेगाव बु. येथील माजी सरपंच राजेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात गावातील नागरिकांनी थेट तहसीलदार यांना निवेदणाद्वारे उपोषण किंवा रास्ता रोको करणार असल्याचे कळविले होते.
बोधेगाव बु. ते उमरावती हा रस्ता गेल्या दोन वर्षापासून मंजूर आहे. बोधेगाव बु पासून दोन कि.मी. रस्त्याचे खडिकरण व मजबुतीकरण झाले असून डांबरिकरण बाकी आहे. प्रश्न होता फक्त बोधेगाव बु. शिवारातील गट क्र. ३९४ मधून जाणाऱ्या ५०० फुट रस्त्याचा जो काही शेतकऱ्यांनी अडविला होता हा रस्ता निजामकालीन नकाशावर आहे या रस्त्यावर शासनाचा रस्ता नमूद असूनही बडोद बाजार पो.स्टे. बांधकाम विभाग, तहसिल कार्यालय, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी संबंधित व्यक्तींला वारंवार लेखी व तोंडी समजावून बघितले असता त्याचा काही परिणाम होत नसल्याने अखेर पोलीस बंदोबस्त लावून अडविलेला रस्ता मोकळा करण्यात आला. यावेळी महसूल, बांधकाम विभाग, गावातील नागरिक व पोलीस प्रशासन यांची उपस्थिती होती.














