कॅबिनेट मंत्र्यांचा मुलगा फरार, राऊतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Foto
मुंबई  : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महायुतीमधील घटक पक्षांच्या विविध पालिकांमधील जागा वाटपासाठी वाटाघाटी सुरू आहेत. यादरम्यान शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अद्याप फरार असल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी सातारा ड्रग्ज कारखान्याच्या सुत्रधारांना अभय दिल्याचा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय राऊत म्हणाले की, ङ्गङ्घमहाराष्ट्रातील कॅबिनेटमधील एक मंत्री, भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. त्याच्यावर प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत एका काँग्रेस कार्यकर्त्यावर ठार मारण्यासाठी हल्ला केला गेला आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली.

हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना?

मंत्री, मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांनी खून केले किंवा चोर्‍या केल्या, दरोडे टाकले, भ्रष्टाचार केला तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांनी अभय दिला आहे का? मंत्र्याचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला जातो, तरी तो सापडत नाही. राज्यातील एक मंत्री बेपत्ता होतो, मी कोकाटेंविषयी बोलतोय. ते ४८ तास सापडत नाहीत, ही पोलिस यंत्रणा आहे की भाजपाची खाकी वर्दीतील टोळी आहे? कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा?फफ अशी घणाघाती टीका राऊतांनी यावेळी केली.

कायदा आणि सुव्यवस्थेवर तुम्ही विधानसभेत भाषण देता की, कोणालाही सोडणार नाही, मग मंत्र्यांचे मुलं मंत्र्यांचे भाऊ, मंत्र्यांचे बाप कसे सुटतात? सातार्‍यामधील ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे देवेंद्र फडणवीस सांगतील का? त्यातील खरे सुत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जवळजवळ गुडघ्यावर बसले आणि देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्जच्या कारखान्याच्या सुत्रधारांना अभय दिला.फफ असा आरोप संजय राऊतांनी केला.

लवकरच नावे जाहीर करणार

एकनाथ शिंदे यांच्याच भावाची आहे ना ती जागा? त्यांना माहिती नाही? मुंबई पोलिस दलातील एका माजी अधिकार्याचाही ड्रग्जच्या कारखान्याशी संबंध आहे आणि तो शिंदे यांच्याशी संबंधित आहे. मी लवकरच नावे घेईन. महाडमधील कॅबिनेट मंत्र्यांचा मुलगा फरार आहे. तो कुठे आहे ते पाहिजे असेल तर मी पोलिसांना सांगतो. राज्यात काय चाललंय? या युती-आघाड्या होत राहतील, असेही संजय राऊत म्हणाले.

तर त्यांचे स्वागत

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा पराभव, त्यांच्याबरोबर असलेल्या आघाडीतील लोक करायला इच्छुक असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. भाजपा बरोबर सत्तेत असलेले लोक त्यांचा पराभव करण्यासाठी आमची मदत करत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे असे वाटत नाही का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.